Join us  

"आहाहा! क्या बात...सगळा रॅायल कारभार! हेमांगी कवीनं शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 7:48 PM

नुकतंच हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनय आणि बिनधास्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. एखाद्या विषयावर तिने घेतलेली भूमिका ती नेमकेपणाने पटवून देते. त्यामुळे हेमांगी कवी ही सोशल मीडियातही चर्चेत असते. नुकतंच हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे. मुंबईतील  रॉयल ऑपेरा हाऊसमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्लू स्कर्ट, व्हाईट शर्ट अशा लूकमध्ये दिसली.

हेमांगीच्या ‘जन्मवारी’ या नाटकाचा प्रयोग  मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाला. यावर तिने खास पोस्ट शेअर केली. तिने लिहले की, खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’ ही इच्छा तो मनी बाळगतोच!तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरा मध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती!"

हेमांगीनं लिहिलं,"काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!खरंच नावाप्रमाणे सगळा रॅायल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं! इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या photos मध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला!", 

"अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय.म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपन ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली. खरंतर मला पण ते वाट पाहणं worth होतं असंच वाटलं!" अशा भावना तीने पोस्टमध्ये व्यक्त केल्या.

 "अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य! माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे.संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती. त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!, असं हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.

हेमांगी  'जन्मवारी' या नाटकात मंजी या देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे.  हे नाटक एका जन्मात आपण जे करतो किंवा आपण जे असतो तसंच पुढच्या जन्मातही असतो का, ते बदलण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीकडे असतं का या विषयावर भाष्य करतं. 

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेता