Join us

​के दिल अभी भरा नहीची सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 16:20 IST

सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अनेक मराठी नाटकं सध्या गाजत असून ...

सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अनेक मराठी नाटकं सध्या गाजत असून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळत आहे.लीना भागवत आणि मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या के दिल अभी भरा नही या नाटकाचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले आहेत. हे नाटक पूर्वी रिमा लागू आणि विक्रम गोखले करत असत. या नाटकाचे सत्तरहून अधिक प्रयोग त्यांनी केले होते. पण विक्रम गोखले यांना संवाद म्हणताना त्रास होत असल्याने त्यांनी नाटकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांनी हे नाटक मंगेश आणि लीना करू लागले. प्रेक्षकांनी मंगेश आणि लीनालादेखील तितकाच प्रतिसाद दिला. मंगेश कदमच या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. ज्येष्ठांपासून तरुण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या या नाटकाने शंभरी पूर्ण केली असून या खास प्रयोगाला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. या शंभराव्या प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांना खास ‘थँक यू’चं कार्ड देणार आले होते.उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आलीय. नोकरी लागली की आर्थिक गणितं जुळवण्याचा माणूस विचार करू लागतो. मात्र हे सगळं करत असताना भावनिक गोष्टी दुर्लक्षित होतात. तसेच रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो. मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधीच केला जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजांचे महत्त्व पटवून देण्यात आलंय. या नाटकात लीनाने साठ वर्षांच्या स्त्रीची भूमिका साकारलीय.