Join us  

‘काय झालं कळंना’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉण्च सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 4:01 PM

शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवताना प्रेमाचा अनोखा पैलू मांडणारा ‘काय झालं कळंना’ हा मराठी चित्रपट येत्या २० जुलैला आपल्या भेटीला येणार आहे

ठळक मुद्दे या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे.

प्रेमाचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या निराळी असते. कुणी प्रेमात सर्वस्व गमावतं तर कुणाला प्रेमातच सर्वस्व सापडतं. शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवताना प्रेमाचा अनोखा पैलू मांडणारा ‘काय झालं कळंना’ हा मराठी चित्रपट येत्या २० जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लॉण्च मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या म्युझिक लॉण्च च्या निमित्ताने कलाकारांनी सादर केलेल्या धम्माल स्किटस् ने उपस्थितांची दाद मिळवली. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे.

‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेला संगीताची उत्तम  साथ देत वेगवेगळ्या धाटणीची  पाच गीते चित्रित करण्यात आली आहेत. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ या शब्दरचनेची  ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत.

‘काय झालं कळंना’ या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.

टॅग्स :संगीत