Join us  

​खुशखबर तात्या विंचू परतणार... झपाटलेला ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 7:22 AM

झपाटलेला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक ...

झपाटलेला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटात प्रेक्षकांना लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचे संवाद तर आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. या चित्रपटातील एका छोट्याशा बाहुल्यालादेखील या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्ध मिळाली होती. तात्या विंचूला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाचे हिंदी भाषेत डब करण्यात आले होते. या चित्रपटाची डबिंग असलेला खिलोना बना खलनायक हा चित्रपटही खूप आवडला होता. मराठी प्रमाणे अमराठी प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला तितकेच प्रेम दिले होते. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी हा एक माइलस्टोन चित्रपट आहे असे म्हटले तर ते नक्कीच चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटामुळे मराठीत एक वेगळा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.झपाटलेला या चित्रपटाला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहाता २०१३ मध्ये महेश कोठारे झपाटलेला २ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले होते. झपाटलेला २ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि दिलीप प्रभाळकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट मराठीतील पहिला थ्री डी चित्रपट होता. या चित्रपटावर निर्माते महेश कोठारे यांनी करोडो रुपये खर्च केले होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटानंतर आता झपाटलेला ३ कधी येणार याची उत्सुकता या चित्रपटाच्या फॅन्सना लागलेली आहे. झपाटलेला ३च्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. झपाटलेला ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.महेश कोठारे यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे झपाटलेला ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महेश कोठारे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये झपाटलेला या चित्रपटाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तात्या विंचू लवकरच पुन्हा परतत असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या ट्वीटनंतर नेटिझननेदेखील रिप्लाय करून तात्या विंचू परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असल्याचे म्हटले आहे. Also Read : आदिनाथ कोठारे बनला लेखक