Join us  

'गर्ल्स'मधली शिस्तीची तितकीच मायाळू 'आई' - देविका दफ्तरदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 3:25 PM

स्वच्छंदी आयुष्य जगतात तेव्हा नक्की काय आणि कसे घडते? मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशाल देवरुखकर यांचा 'गर्ल्स' चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मिळतील.

सध्या सर्वत्र फक्त 'गर्ल्स'चाच बोलबाला आहे. 'गर्ल्स' सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला किंबहुना देत आहेत. 'गर्ल्स' म्हटल्यावर हा चित्रपट मुलींवर आणि त्यांच्या आयुष्यावर केंद्रित असला,  तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.  पूर्वीपासूनच मुलींसाठी समाजाचे, नातेवाईकांचे अलिखित असे काही नियम आहेत. या नियमांची चौकट इच्छा नसतानाही सर्व मुलींना पाळावी लागते. ही चौकट, बंधने झुगारून जेव्हा मुली मोकळा श्वास घेतात, स्वच्छंदी आयुष्य जगतात तेव्हा नक्की काय आणि कसे घडते? मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशाल देवरुखकर यांचा 'गर्ल्स' चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मिळतील.

 अनेक आशयपूर्ण चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या देविका दफ्तरदार यांनी या चित्रपटात 'मती'च्या म्हणजेच अंकिता लांडेच्या आईची भूमिका साकारली आहे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातील आई आपल्या मुलींबाबत, त्यांच्या राहणीमानाबाबत, त्या कुठे जातात, काय करतात, मित्रपरिवार कोण आहे याकडे जितके बारीक लक्ष देऊन असते, अगदी तशीच हुबेहूब आई देविका यांनी साकारली आहे. आपल्या किशोरवयीन मुलीवर एखादी आई जसे निर्बंध लादते, तशीच ही आई सुद्धा 'मती'वर निर्बंध घालत आहे, अनेक गोष्टी करण्यापासून तिला रोखत आहे. अर्थात या सगळ्यामागे तिची काळजी आणि प्रेम आहे. आई-मुलीचे घराघरात दिसणारे हे नाते या चित्रपटातून सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे ही आई आपल्याला आपल्यातलीच वाटेल. हा चित्रपट का पाहावा, याबाबत देविका दफ्तरदार म्हणतात, ''तसे पाहिले तर प्रत्येक घराघरात घडणारी ही कथा आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही तुमच्या आयुष्याशी सहजरित्या जोडू शकता. हा सिनेमा बघताना तरुण मुली या तीन 'गर्ल्स'मध्ये स्वतःला बघतील, तर त्या तीन मुलींच्या पालकांमध्ये प्रत्येक पालक स्वतःला शोधेल. पालकांनी मुलांच्या स्वातंत्र्यावर कितीही बंधने घातली, मर्यादा घातल्या तरीही अडचणीत सापडल्यावर ते आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतातच. याचा प्रत्यय 'गर्ल्स' बघताना नक्कीच येईल. पालक आणि मुलांचा एकमेकांविषयी असलेला वैचारिक दृष्टिकोन सकारात्मकतेने बदलणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक पाल्याने हा चित्रपट आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा.''

     

या चित्रपटात अंकिता लांडे, केतली नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात छोटीशी तरीही महत्वपूर्ण अशी भूमिका स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेंन्ट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'गर्ल्स' या चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार आहेत. तर सहाय्यक निर्मात्याची धुरा अमित भानुशाली यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे. 

टॅग्स :गर्ल्स