वजनदार हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. तसेच या चित्रपटासाठी वजनदार बनलेल्या प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांचेदेखील बरेच कौतुक झाले आहे. या दोन अभिनेत्रींसोबत अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि चिराग पाटीलदेखील वजनदार भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. चिराग पाटील हा क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे. अशा या तरूण कलाकारांसोबत आणखी एक चेहरा या चित्रपटात पाहायला मिळाला आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेता गौरव घाटणेकर. गौरव हा तुझविन सख्या रे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. या मालिकेतील अभिनेत्री कादंबरी कदम आणि गौरवची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. आता गौरव हा वजनदार चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. त्याची ही भूमिका खरचं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे. गौरव हा सध्या मिस्टर अॅण्ड मिस्टर हे नाटकदेखील करत आहे. त्याचे हे नाटकदेखील सध्या चर्चेत आहेत. त्याचबरोबर तो महेश मांजरेकर यांच्या वाडा या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. वाडा या चित्रपटात गौरवसोबत अनेक मराठी कलाकार दिसणार असल्याचे कळत आहे. शशांक केतकर, नेहा महाजन अशी काही नावांचा यामध्ये समावेश आहे. नाटक, मालिका, चित्रपट पाहता गौरवची गाडी एकदम सुसाट निघाली आहे. आता तो, सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटातदेखील त्याची भूमिका वजनदार असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरताना दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती 'लॅन्डमार्क फिल्म्स' या कंपनीने केली आहे.
वजनदार चित्रपटात गौरव साकारतोय 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 13:23 IST