Join us

​गजेंद्र अहिरेचा कुलकर्णी चौकातला देशपांडे प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 14:45 IST

गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत आणि आता ते पुन्हा एकदा एक मराठी ...

गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत आणि आता ते पुन्हा एकदा एक मराठी चित्रपट घेऊन येत असून त्याची घोषणा त्यांनी नुकतीच सोशल मीडियाद्वारे केली आहे. या चित्रपटाचे नाव कुलकर्णी चौकातला देशपांडे असे असून या चित्रपटाची निर्मिती विनय गानू करणार आहेत. या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा एक आशयघन चित्रपट असल्याचे या चित्रपटाच्या पोस्टरवरून आपल्याला दिसत आहे. या पोस्टरमध्ये आपल्याला अनेक चेहरे पाहायला मिळत आहेत. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत असणार याबाबत निर्मात्यांनी आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेच मौन राखणे पसंत केले आहे. पण या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गजेंद्र अहिरे यांनी रंगभूमीवरून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आईचं घर उन्हाचं या नाटकात कामदेखील केले होते. तसेच ते वयाच्या 23व्या वर्षापासून अनेक नाटके लिहित आहेत. त्यांनंतर त्यांनी अनेक मालिका लिहिल्या. श्रीमान श्रीमती ही त्यांनी लिहिलेली मालिका प्रचंड गाजली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्या चित्रपटाचे समीक्षक-प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. त्यांच्या या पहिल्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. एलिझाबेथ एकादशी, शेवरी यांसारख्या त्यांच्या चित्रपटांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.