डॅडीमध्ये पूर्णानंद दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 16:29 IST
डॅडी या चित्रपटाचे दिग्दर्शन असीम अहलुवालिया करत असून अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा ...
डॅडीमध्ये पूर्णानंद दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
डॅडी या चित्रपटाचे दिग्दर्शन असीम अहलुवालिया करत असून अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या जीवनावर आधारित आहे. अरुण गवळीचा डॉन होण्याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अरुण गवळीच्या बीआरए गॅंगमध्ये बाबू, रामा आणि अरुण असे तीन जण होते हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. या त्यांच्या गॅंगमध्ये या तिघांप्रमाणे विजय हा त्यांचा आणखी एक साथीदार होता. या विजयची भूमिका एक मराठी अभिनेता साकारणार आहे. अभिनेता पूर्णानंदने अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तुकाराम ,फॅन्ड्री, आजचा दिवस माझा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता डॅडी या चित्रपटात पूर्णानंद एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनेक मराठमोळे चेहरे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. डॅडी या चित्रपटात बाबूची भूमिका आनंद इंगळे तर रामाची भूमिका राजेश शृंगारपुरेने साकारली आहे. या गॅंग मध्ये तिघांच्या सोबत अजून एक व्यक्ती असतो, जो या गॅंगचा "छुपा चेहरा" असतो, तो म्हणजेच विजय. डॅडी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पूर्णानंदचा अनुभव खूपच चांगला होता. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल आणि प्रेक्षक या चित्रपटाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतील याची सगळेच वाट पाहात आहेत. पूर्णानंददेखील त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूपच उत्सुक आहे. Also Read : तुम्हाला माहीत आहे का ही मराठमोळी अभिनेत्री आहे डॅडी चित्रपटाचा भाग