Join us  

"गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 10:33 AM

अभिनेता जितेंद्र जोशीने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटासंदर्भातील आनंदाची वार्ता नुकतीच त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याची निर्मिती असलेल्या आणि अभिनीत गोदावरी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर कॅनडातील ‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’मध्ये होणार आहे.

जितेंद्र जोशीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गोदावरी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, आम्ही ठरवलं होतं एक कागदाची होडी करु आणि सोडू नदीत. जिथे जिथे पोहोचेल तिथून हाक येईल. पाहू कुठं कुठं पोहचते. पहिली हाक आलीय….व्हॅन्कुवर (कॅनडा) इथून. गोदावरी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार ‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ मध्ये. गोदावरीचा वर्ल्ड प्रिमिअर !

त्याने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, नदीत सोडलेली आठवण जितकी गहिरी … तितके नदीचे तरंग दूरवर पसरतात. पहिलाच तरंग कॅनडापर्यंत गेलाय. गोदावरी उगमाचे साक्षीदार व्हा ! आशिर्वाद असू द्या.

गोदावरी चित्रपटात नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट रेखाटण्यात आली आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी गोदावरीची निर्मिती केली आहे. पवन मालू, मिताली जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर आकाश पेंढारकर, पराग मेहता हे सहनिर्माते आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने हे कलाकार पहायला मिळणार आहेत. कथा पटकथा निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुखचे असून संवाद ही प्राजक्त देशमुखचे आहेत. जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुलचंद्रने संगीत दिले आहे.

टॅग्स :जितेंद्र जोशीगौरी नलावडे