Join us  

प्रथमेश परबचा आगामी सिनेमा ‘टकाटक २’चे शूटिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 7:37 PM

कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक २’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे.

दोन वर्षांपूर्वा मराठी चित्रपटांच्या तिकिटबारीवर दुष्काळ असताना ‘टकाटक’सारखा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यशस्वीपणे बिझनेस करत प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. त्यानंतर ‘टकाटक २’ या नावाने याच चित्रपटाचा पुढील भाग काढण्याची योजना आखण्यात आली. ‘टकाटक २’ला ही नशीबाची साथ लाभली आणि कोरोना व लॉकडाउनच्या भयावह वातावरणातही हा चित्रपट आपलं शूटिंग पूर्ण करण्यात यशस्वी झाला आहे. हे केवळ प्रेक्षकांचं प्रेम आणि शुभेच्छांच्या बळावरच शक्य झाल्याचं मत ‘टकाटक २’च्या टीमनं व्यक्त केलं आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांची निर्मिती तसेच जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या ‘टकाटक २’च्या टीमनं गोव्यामध्ये मुहूर्तानंतर लगेचच तिथलं शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोव्यात शूटिंगवर बंदी घालण्यात आली होती.

दुसऱ्या लॉकडाऊननंतर पुन्हा निर्बंध शिथिल होताच ‘टकाटक २’च्या टीमनं वेगवान हालचाली करत अल्पावधीत शूटिंगचं पुढील शेडयुल आखत बारामती आणि भोर मध्ये शूटिंग करण्याची योजना आखली. ‘टकाटक २’चं बारामती आणि भोर येथील अखेरचं शूटिंग शेडयुल नुकतंच निर्विघ्ननपणे संपन्न झालं असून, या दरम्यान पुन्हा एकदा कलाकार-तंत्रज्ञांना धम्माल करण्याची संधी मिळाली. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक २’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब सोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘टकाटक २’च्या माध्यमातून मिलिंद कवडे यांनी पुन्हा एकदा तरूणाईला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवला आहे. ‘टकाटक 2’मध्ये प्रथमेशनं साकारलेल्या ठोक्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं होतं. आता हा ठोक्या ‘टकाटक 2’मध्ये कशा प्रकारची धम्माल करतो ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शनासोबतच ‘टकाटक २’ची संकल्पना दिग्दर्शक, कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांचीच आहे. संवादलेखन किरण बेरड यांनी केलं असून, हजरत शेख वली या चित्रपटाचे डीओपी आहेत. गीतलेखनाची जबाबदारी जय अत्रे यांनी सांभाळली असून, वरूण लिखते यांनी संगीताद्वारे वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानं ‘टकाटक २’ची संपूर्ण टीम खूप आनंदी असून, आता पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात करण्यात येणार आहे.

टॅग्स :प्रथमेश परबटकाटक