Join us  

अखेर मिलिंद गुणाजी यांचा लेक अडकला लग्नबेडीत, निसर्गरम्य मालवणमध्ये पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 1:45 PM

मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांच्या मुलाचा विवाहसोहळा निसर्गसौंदर्याने वेढलेल्या मालवणच्या एका मंदिरात पार पडला.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) व राणी गुणाजी (Rani Gunaji) यांचा मुलगा अभिषेक गुणाजी (Abhishek Gunaji) हा नुकताच राधा पाटीलसोबत लग्न बंधनात अडकला. या दोघांच्या जोडप्याची चर्चा ही त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर खूप रंगली होती. त्यांचे सोशल मीडिया वरील फोटो व त्यांचा विलक्षण जोडा हा सध्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा चर्चेचा विषय आहे. अभिषेक आणि राधा यांचा विवाह, मालवण येथे नयनरम्य वातावरणात पार पडला. 

मिलिंद आणि राणी गुणाजी मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेते व सूत्रसंचालक आहेत. त्यांनी आपले आशीर्वाद देत अभिषेक आणी राधा यांच्या ‘अनोख्या डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रातील निसर्ग आणि साधेपणाची संस्कृती जपत लग्न करण्याचा निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला.

मिलिंद गुणाजी सांगतात की,"आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत.त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले."

अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, जो आता चित्रपट आणि निर्मितीच्या प्रेमात पडला होता. अभिषेकाची पत्नी राधा, हि देखील मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे.

अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.

टॅग्स :मिलिंद गुणाजी