Join us  

लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरला दुखापत होऊनही तिने केले उडंगा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 6:30 AM

झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या “लागिरं झालं जी” या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे “शिवानी बावकर”. शीतल या ...

झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या “लागिरं झालं जी” या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे “शिवानी बावकर”. शीतल या कणखर व्यक्तिरेखेमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली शिवानी सध्या उडंगा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच तरुणाईमध्ये या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.मैत्रीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये शिवानी मीरा नावाची एक अत्यंत सुंदर व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेविषयी शिवानी सांगते, माझ्या आयुष्यातील हा पहिला चित्रपट आहे. याआधी मी कधीच कॅमेरासमोर गेली नव्हती. मीरा या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचा मला जेव्हा फोन आला, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा होता. कारण मला पहिल्याच चित्रपटात मीरा ही अतिशय चांगली व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मीरा आणि शिवानीमध्ये खूपच सार्धम्य आहे. पण तरीही तिचा साधेपणा, सरळपणा, तिचा निरागसपणा, तिचे हसणे, एका विशिष्ट दडपणाखाली जगणे हे सारे माझ्यासाठी नवे आणि आव्हानात्मक होते. कारण मी मीरासारखी मुलगी कधी पाहिलीच नव्हती. मी मुंबईकर असल्याने खेड्यातील मीरा समजायला प्रथम जडच गेलं, परंतु आमचे दिग्दर्शक विक्रांत वार्डे यांनी मला खूप समजावून उमजावून माझ्याकडून मीरा करून घेतली आणि मी आज ज्यावेळी मी तिला पडद्यावर पाहते, तेव्हा मला खात्री वाटते की मीरा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये एक मीरा असतेच. मीराविषयी अधिक बोलताना विक्रांत वार्डे सांगतात की, लेखकाने अतिशय तरलतेने रेखाटलेली मीरा त्याच ताकदीने उभी करणारी मुलगी मिळणे खूप कठीण झाले होते. अनेक ठिकाणी खूप साऱ्या ऑडिशन्स घेतल्या गेल्या. परंतु मीरा काही मिळत नव्हती. एकेदिवशी जेमिनी स्टुडिओच्या इथे ऑडिशन्स सुरू असताना आमचा मित्र सचिन इंदुलकर एका मुलीला आमच्याकडे घेऊन आला. फक्त त्याच्या आग्रहामुळे इच्छुक मुलीची ऑडिशन घेण्यात आली होती. मीरा आणि तिच्यात काही साम्य आढळल्याने पुढे तिचे अनेक राऊंडस घेण्यात आले आणि आईसोबत एका दुसऱ्या कामासाठी तिथे आलेली मुलगी मीरा झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान शिवानीला चांगलीच दुखापत झाली होती. पण तरीही हार न मानता तिने तिचे चित्रीकरण पूर्ण केले. तळा-इंदापूर भागात चित्रीकरण सुरू असताना तिचा अॅक्सिडेंट होऊन पायाला तिला चौदा टाके पडले होते. गण्या (चिन्मय संत) आणि मीरा दोघे सायकलवरून जात असतानाच्या सीनचे चित्रीकरण सुरू असताना तिचा पाय वेगात असलेल्या सायकलच्या चाकात गेल्याने दोघे कोसळले. शिवानीचा पाय रक्तबंबाळ झाल्याने तातडीने तिला नजीकच्या रुग्णायलात नेण्यात आले. जखम खूपच खोल असल्याने डॉक्टरांकडे टाके घालण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप टाके पडल्याने त्यांनी तिला सक्तीची बेडरेस्ट घ्यायला सांगितले. यामुळे पूर्ण युनिटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या मुश्किलीने जमवलेले युनिट, त्यांच्या तारखा, हिशोब यामुळे निर्मात्यांसहित सगळ्यांच्यासमोर पुढे कसे होणार हाच एक प्रश्न उभा ठाकला होता. ही गोष्ट शिवानीच्या कानी पडताच तिने मागचा पुढचा विचार न करता मी शुटिंग करायला तयार आहे असे कळवले. दोन पाऊलंही व्यवस्थित टाकू न शकणारी शिवानी कसे काय शुटिंग करणार अशी सगळ्यांनाच चिंता होती. पण तरीही ती सेटवर आली. अपघातानंतर जेव्हा पहिल्यांदा शिवानी चित्रीकरणासाठी आली, त्यावेळी अख्ख्या टीमसहित स्थानिक गावकऱ्यांनीही जोरदार टाळ्या वाजवत तिचे स्वागत केले. अनेक अडचणींवर मात करत तिने उरलेले चित्रीकरण पूर्ण केले. शेवटच्या दिवशी तर कोरलई किल्ला सर करून किल्ल्यावरील शुटिंग पूर्ण केल्याने ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली.४ ऑगस्टला येत असलेल्या सायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद निर्मित उडंगा या चित्रपटात शिवानी बावकरसोबत चिन्मय संत आणि स्वप्निल कणसे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे, संग्राम समेळ, प्रतिभा वाले, शर्वरी गायकवाड, पांचाळ काका यांच्यासमवेत अनेक कलाकारांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. विक्रांत वार्डे यांनी या चित्रपटात दिग्दर्शनासोबतच संगीत दिग्दर्शकाचीही भूमिका पार पाडली आहे. अनेक नामवंत गायकांनी या चित्रपटासाठी आपला स्वरसाज चढवला आहे. Also Read : ​'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल