Join us  

'आजही 'माहेरची साडी' विस्मरणात गेलेली नाही', अलका कुबल यांनी मानले रसिकांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 5:04 PM

१९९१ साली माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.

१९९१ साली माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी साधारण होती. या चित्रपटात अलका कुबल यांनी सूनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’, ‘माझं छकुल छकुल’ ही गाणीदेखील खूप हिट झाली होती. आता या चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा चित्रपट आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत.

अलका कुबल यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर माहेरची साडी चित्रपटाला ३० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटातील काही फोटो शेअर करत लिहिले की, ३० वर्षे माहेरची साडीचे. अवघ्या मराठी माता भगिनींच्या हृदयात हक्काचे स्थान मिळवलेला "माहेरची साडी" हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज तीन दशके झाली.या काळात अवघ्या मराठी माणसांनी "आपली ताई" म्हणून मला सन्मान दिला. माझे कोडकौतुक केले. आजही "माहेरची साडी" विस्मरणात गेलेली नाही. त्याबद्दल मी तमाम मराठी रसिकांची मनापासून आभारी आहे. असंच उदंड प्रेम यापुढेही मिळावे, हीच अपेक्षा.

मीडिया रिपोर्टनुसार माहेरची साडी चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. दिग्दर्शक विजय कोंडके याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती करणार आहेत.

एका वेबसाइटला ‘माहेरची साडी २’ संदर्भात मुलाखत देताना विजय कोंडके म्हणाले होते की, माहेरची साडी २ काढण्याचा माझा विचार आधीपासूनच होता. माहेरची साडीमध्ये अलका शेवटी मरते असं दाखविण्यात आलं होतं. ती गेल्यानंतर तिने जन्म दिलेल्या मुलाचं आणि तिच्या कुटुंबाच काय झालं असेल? या अनुषंगाने आता हा पुढचा चित्रपट सुरु होईल.

टॅग्स :अलका कुबल