Join us  

'एकच प्याला' नव्या ढंगात, हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 6:30 AM

१९१७ साली राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले 'एकच प्याला' हे नाटक आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर होत आहे.

मराठीतील अजरामर नाटकांमधील एक असलेले आणि १९१७ साली राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले 'एकच प्याला' हे नाटक आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेल्या या नाटकातील तळीराम, सुधाकर आणि सिंधू ही प्रमुख पात्र, प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याद्वारे रंगभूमीवर पुन्हा एकदा अवतरणार आहेत. रंगशारदा प्रतिष्ठान निर्मित 'संगीत एकच प्याला' या नाटकात अंशुमन विचारे, संग्राम समेळ आणि संपदा माने या आजच्या कलाकारांची फळी आपणास पाहायला मिळणार आहे. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात ११ मे रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. 

परिणामकारक नाट्य आणि सादरीकरण या बळावर थोडीथोडकी नव्हेत तर रंगभूमीवर १०० वर्षे राज्य गाजवणारे हे नाटक शताब्दीवर्षपूर्तीचे औचित्य साधून, रसिकांच्या भेटीला येत आहे. या संगीत नाटकातील सुधाकरची भूमिका अभिनेता संग्राम समेळ करीत असून, सिंधूची भूमिका गुणी अभिनेत्री संपदा माने साकारत आहे. शिवाय 'तळीराम' ही राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, जयंत सावरकर अशा दिग्गजांनी सजवलेली भूमिका अभिनेता अंशूमन विचारे करत आहे. तसेच अन्य भूमिकांतही शुभांगी भुजबळ, शुभम जोशी, मकरंद पाध्ये, शशिकांत दळवी, विजय सूर्यवंशी, दीपक गोडबोले, विक्रम दगडे, रोहन सुर्वे, प्रवीण दळवी अशा गुणी कलाकारांची उपस्थिती आहे. 

नवीन पद्धतीच्या सादरीकरणाबरोबरच पारंपारिकतेचे साज चढवलेल्या या नाटकाचे नेपथ्य आघाडीचे नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी केले आहे. तर, ज्येष्ठ संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचे संगीत मार्गदर्शन लाभले असून, त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची संगीत साथ आहे. सुत्रधार गोट्या सावंत व कार्यकारी निर्माती सविता गोखले आहेत.

दारूच्या एका प्यालामुळे आजही अनेक तरुणांच्या आयुष्याची आणि पर्यायाने त्यांच्या संसारांची  दुरावस्था होत आहे, त्यामुळे आजही तितक्याच ज्वलंत असलेल्या विषयावरील ह्या दर्जेदार नाटकाचे मायबाप रसिक स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :संग्राम समेळअंशुमन विचारे