Join us

'एक आमचा बाणा' हे आशिष मोरेचे गीत प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 17:16 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या भूमीचा जितका अभिमान बाळगावा तितका थोडकाच! महाराष्ट्राच्या याच तांबड्या मातीचा आणि मराठी संस्कृतीचा जयघोष ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या भूमीचा जितका अभिमान बाळगावा तितका थोडकाच! महाराष्ट्राच्या याच तांबड्या मातीचा आणि मराठी संस्कृतीचा जयघोष करणारा एक आमचा बाणा हे गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त हे गाणे संगीतकार आशिष मोरेने सादर केले आहे. अश्वरथ क्रिएशन प्रस्तुत या गाण्याचे बोल, संगीत आणि स्वर आशिष मोरेचेच असून या गाण्याचे संगीत संयोजन केदार भागवतचे आहे. हे गाणे समीर आडके यांनी दिग्दर्शन केले असून गजानन सुतार यांनी सिनेमोटोग्राफी केली आहे. या गाण्यात अस्सल मराठी बाज दिसून येत असून महाराष्ट्राच्या कणाकणात वसलेली जाज्वल्य संस्कृती या गाण्यात पाहायला मिळत आहे. आशिष मोरेचे नाव 'काटा किररर्र' या सुप्रसिद्ध गाण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. आदर्श शिंदे याच्या आवाजातील या सुपरहिट गाण्याला रसिकांनी चांगलीच पसंती दिली होती. आजही हे गाणे प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. 'एक आमचा बाणा' या महाराष्ट्राच्या गौरवगीताला देखील रसिक असाच प्रतिसाद देतील अशी आशा आशिष मोरेने व्यक्त केली आहे.  विशेष म्हणजे नवीन होतकरू कलाकारांना एकत्र घेऊन या गाण्याचे सादरीकरण आशिष मोरेने केले आहे. तसेच या गाण्यात महाराष्ट्राची कन्या आणि भारताची धावपटू ललिता बाबरची छबी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अल्बममध्ये कलाकारांना न घेता सामान्य लोकांना संधी देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या अभिमानापर गायलेल्या अनेक गाण्यांमध्ये आणि गौरवगीतांमध्ये 'एक आमचा बाणा' या गाण्याचा देखील समावेश होईल अशी आशिष मोरेला खात्री आहे.