Join us  

सउदी अरेबियामध्ये बुरखा घालून एअरहोस्टेसचे काम करायची ही मराठमोळी अभिनेत्री, हिंदीतही आहे फेमस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 9:00 AM

मराठी आणि हिंदीमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. 'बेवफा', 'राजा हिंदुस्तानी', 'यादें', 'जोडी नं-१,' 'ताल', 'जिस देस मै गंगा रेहता है','वेलकम बॅक'  जवळपास ५० हिंदी सिनेमात त्यांनी काम केले आहे.

मराठी कलाकार हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडतात. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून ते आजच्या सिद्धार्थ जाधवपर्यंत अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. यांत एका मराठी अभिनेत्रीच्या नावाचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया कर्णिक.

१९९६ साली 'तिसरा डोळा' या मालिकेत सुप्रिया यांनी काम केले होते. या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. दिवंगत अभिनेते रमेश भाटकर आणि सुप्रिया कर्णिक या जोडीने रसिकांची पसंती मिळवली होती.  ही मालिका खूप गाजली होती. इतक्या वर्षानंतरही रसिकांना मालिका, कलाकार आणि मालिकेचे शीर्षक गीत आजही चांगलेच लक्षात आहे. 

खरंतर अगदी लहानवयातच सुप्रिया यांनी पैसे कमवण्यासाठी मिळेत ते काम करायला सुरुवात केली होती. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुलांच्या ट्युशन घेतल्या, दुकानातही काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट आणि रिअल इस्टेट,रिपेअरिंग जिथे कामाच्या संधी मिळत गेल्या त्या काम करत राहिल्या.

पुढे त्यांनी सउदी अरेबियामध्ये बुरखा घालून एअरहोस्टेसचेसुद्धा काम केले. मात्र सउदी अरेबियामध्ये कामात त्यांचे मन रमत नव्हते. ती नोकरी सोडून त्या पुन्हा मायदेशी परतल्या आणि इथेच काम करायला सुरुवात केली. भारतात आल्यानंतर त्या अभिनयक्षेत्राकडे वळल्या.

मराठी आणि हिंदीमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. 'बेवफा', 'राजा हिंदुस्तानी', 'यादें', 'जोडी नं-१,' 'ताल', 'जिस देस मै गंगा रेहता है','वेलकम बॅक'  जवळपास ५० हिंदी सिनेमात त्यांनी काम केले आहे. या सिनेमांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. त्यांच्या भूमिकांनाही रसिकांनी डोक्यावर घेतले होते. 

अभिनयात यशस्वी ठरलेल्या सुप्रिया आजही अविवाहीत आहेत. दोनवेळा त्या प्रेमात पडल्या मात्र दोन्ही वेळा त्यांची फसवणूक झाली. त्यानंतर लग्नाचा फारसा विचार केला नाही. आता गेल्या काही वर्षापासून त्या बॉलिवूडपासूनही दूरच आहेत. अभिनयापासून दूर जात त्या आध्यात्मकडे वळल्या आहेत. तरुणांना अध्यात्मविषयी मार्गदर्शनही सुप्रिया करतात. सुप्रिया काही वर्षापासून रुपेरी पडद्यावर झळकल्या नसल्या तरी त्यांची जादू आजही कायम आहे. आजही त्यांचे चाहते त्यांच्यावर पूर्वीइतकेच प्रेम करतात.