Join us

सलमान खान का म्हणतोय महेश मांजरेकरचा ध्यानीमनी चित्रपट पाहू नका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 11:21 IST

महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे यांची प्रमुख भूमिका असलेला ध्यानीमनी हा चित्रपट पाहू नका असे आवाहन सलमान खान करत आहे. सलमान प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सुनील बर्वे, प्रिया बापट, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोती, सुबोध भावे आणि वैभव मांगलेदेखील हा चित्रपट बघू नका असे लोकांना सांगत आहेत.

महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या ध्यानीमनी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर सलमान खानने त्याच्या ट्विटर हँडलवरून लाँच केले होते. हे ट्रेलर लाँच करताना ध्यानीमनीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असे ट्वीटदेखील सलमानने केले होते. चंद्रकांत कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनंतर अश्विनी भावे मराठी चित्रपटात परतणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाता एक स्त्री आणि तिच्या आपल्या मुलाबद्दल असलेल्या भावना याविषयी हा चित्रपट असेल अशी लगेचच कल्पना येते. महेश आणि अश्विनीसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल यात काही शंकाच नाही. पण असे असूनही हा चित्रपट पाहू नका असे आवाहन मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार करत आहेत. हा चित्रपट पाहू नका असे सांगणारे अनेक सेलिब्रेटींचे व्हिडिओ सध्या आपल्याला सोशल नेटवर्किंग साइटवर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे.सलमानने काही दिवसांपूर्वी ध्यानीमनी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला असला तरी आता तो चित्रपट पाहू नका असे आवाहन स्वतः सलमानच करत आहे. सलमानचा याबाबत एक व्हिडिओ युट्युबला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये बघू नका... प्लीज तो बघू नका असे म्हणताना सलमान खान आपल्याला दिसत आहे. त्याच्यासोबतच या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सुनील बर्वे, प्रिया बापट, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोती, सुबोध भावे आणि वैभव मांगलेदेखील हा चित्रपट बघू नका असे लोकांना सांगताना दिसत आहेत.कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जाते. हा चित्रपट बघू नका या व्हिडीओमधून सध्या ध्यानीमनीचे चांगलेच प्रमोशन बॉलिवूड सेलिब्रेटी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून केले जात आहे.