Join us  

“सामान्य जनतेशी असलेली नाळ...”, विजू मानेंकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक; 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 5:11 PM

विजू माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं.

विजू माने यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेल्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सतत नवे प्रयोग करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. विजू माने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर विविध व्हिडीओ, फोटो शेअर करत ते चाहत्यांशी कनेक्ट राहतात. याशिवाय त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयीही ते सांगत असतात.

अशातच विजू माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

'

विजू माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं, 'राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास 20 वर्ष ( कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता ह्या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले'.

पुढे ते पोस्टमध्ये म्हणाले, 'मी माननीय शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटी गाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे. राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं. थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही'.

'माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली माझ्या घरी गणपतीला याल का ? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले', असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं

'कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही, याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे', या शब्दात विजू माने यांचे भरभरुन कौतुक केलं. 

 गेल्यावर्षीही विजू माने यांनी एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट केली होती. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोजित सोहळ्यात विजू माने यांनी  "खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही" अशा शब्दात स्वरचित कविता सादर केली होती. ही कविता म्हणजे जणू एकनाथ शिंदेंची संघर्षगाथाच होती.

विजू माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते शिकारी, बायोस्कोप , पांडू, मंकी बात, रेगे यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. दिग्दर्शन आणि लेखनाव्यतिरिक्त विजूने 'रेगे' आणि 'प्रभो शिवाजी राजा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :विजू मानेएकनाथ शिंदेमराठी अभिनेतासेलिब्रिटी