Join us  

'कट्यार काळजात घुसली'नंतर दिग्दर्शक सुबोध भावेचा नवा चित्रपट, टीझर पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:30 PM

'कट्यार काळजात घुसली' चित्रपटानंतर आता सुबोध भावे आणखी एक अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येतो आहे.

'कट्यार काळजात घुसली' या अजरामर संगीत नाटकावर तितकाच उत्तम चित्रपट अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शित केला. या चित्रपटाला मिळाळेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सुबोध भावे 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे नाव 'मानापमान' असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिले होते, तर शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. नाटकाचे संगीत गोविंदराव टेंबे यांनी केले होते, तर चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत. 

नमन नटवरा सारखी नांदी या नाटकाने दिली होती. तर नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले,  युवतीमना दारुण रण अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आले होते, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कट्यार काळजात घुसलीद्वारे सुबोध भावने दमदार दिग्दर्शकीय पदार्पण केले होते, शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम नवी गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न आहेत. जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे "कट्यार काळजात घुसली" चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती त्याप्रमाणेच "मानापमान" या चित्रपटाला देखील पसंती मिळेल आणि श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल यात शंका नाही. 

टॅग्स :सुबोध भावे