Join us

Prasad Oak : पीरियड फिल्म्समधून होणार प्रसाद ओकची ‘सुटका’...! अभिनेत्याने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:28 IST

Prasad Oak : होय, प्रसादने तासाभरापूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. वाचून व्हाल क्रेझी...

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने हे वर्ष गाजवलं. होय, या वर्षात त्याचा ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमातील प्रसादने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.  शिवाय याच वर्षात प्रसादने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या वर्षातील या यशस्वी कामगिरीनंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. होय, पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भुमिकेतून त्याचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

प्रसादच्या या आगामी सिनेमाचं नाव ‘सुटका’ (Sutka) असं आहे. प्रसादने तासाभरापूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं. प्रसाद या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, हेमंत एदलाबादकर या सिनेमाचे लेखक आहेत. कलाकारांचं काय? तर प्रेक्षकांचा आवडता अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) या चित्रपटात लीड रोल साकारतोय. त्याच्यासोबतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. आणखी एक खास बात म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शोमधून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता ओंकार राऊत हा देखील या चित्रपटात झळकणार आहे.  

प्रसादची खास पोस्ट

‘सुटका’चं पोस्टर रिलीज करणारी पोस्ट प्रसादने शेअर केली. या पोस्टला त्याने दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘पीरियड फिल्म्समधून प्रसाद ओकची ‘सुटका’, लव्हीडव्ही इमेजमधून प्रार्थना बेहरेची ‘सुटका’, लव्ह स्टोरीजमधून स्वप्नील जोशीची ‘सुटका’... नवं काय? व्हाट नेक्स्ट? अशा प्रश्नांमधून होणार आमच्या सगळ्यांची ‘सुटका’...’असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलेलं आहे. प्रसादने शेअर केलेली ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रसाद ओक सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे. स्वप्नील जोशी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करतोय. प्रार्थना बेहरेची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका नुकतीच संपली आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक स्वप्निल जोशीप्रार्थना बेहरेमराठी अभिनेता