Join us  

-तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसून राहायचं का? महेश टिळेकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 3:25 PM

बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन त्यावर...महेश टिळेकरांची जळजळीत पोस्ट...

ठळक मुद्देफेसबुकवर एक जळजळीत पोस्ट लिहून महेश टिळेकरांनी या प्रकाराबद्दल मीडियाचा समाचार घेतला.

गांजा ओढून दारू पिऊन बातम्या देणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते असे स्तंभ जर खोट्या बातम्या देऊन इतरांना स्तंभित करत असतील तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसून राहायचं का? अशा शब्दांत सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेश टिळेकर (Mahesh Tilekar)यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या तीव्र प्रतिक्रियेमागचे कारणही तसंच आहे. तुम्हाला आठवत असेलच की, काही दिवसांपूर्वी राज कुंद्राच्या प्रकरणात फक्त नाव साधर्म्यामुळे काही वृत्त वाहिन्यांनी अभिनेता उमेश कामतचा फोटो दाखवला होता. असाच काहीसा प्रकार आता ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींबद्दलही घडला आणि महेश टिळेकर संतापले. सुलोचना दीदींचा (Sulochana) फोटो पण माहिती मात्र मुकपटात काम करणा-या अभिनेत्री सुलोचना (रूबी मायरस Ruby Myers या नावाने त्या ओळखल्या जातात) यांची, असा हा प्रकार पाहून टिळेकर भडकले आणि सोशल मीडियावर त्यांनी आपला हा संताप व्यक्त केला.फेसबुकवर एक जळजळीत पोस्ट लिहून त्यांनी या प्रकाराबद्दल मीडियाचा समाचार घेतला. मराठी हिंदी सिनेमांमध्ये नायिका ते चरित्र अभिनेत्री अश्या भूमिका साकारणा-या सुलोचना दीदी जनतेला, सिने रसिकांना अजूनही माहीत आहे.मग तरीही ब्रेकिंग न्यूज, सणसणीत काहीतरी देण्याच्या चढाओढीत असणारे हे काही पत्रकार गांजा ओढून की दारू ढोसून छाती ठोकपणे अश्या बातम्या देतात? महेश टिळेकरांची पोस्ट...

गांजा ओढून दारू पिऊन बातम्या देणारे

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते असे स्तंभ जर खोट्या बातम्या देऊन इतरांना स्तंभित करत असतील तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसून राहायचं का?

हे काही न्यूजवाले बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन त्यावर माहिती मात्र मुकपट(silent movie) चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना, ज्या रुबी मायरस Ruby Myers या नावाने ओळखल्या जात होत्या,ज्यांना 1973 साली दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची माहिती माहिती देण्याचं धाडस कसं करू शकतात.मराठी हिंदी सिनेमांमध्ये नायिका ते चरित्र अभिनेत्री अश्या भूमिका साकारणाऱ्या सुलोचना दीदी जनतेला, सिने रसिकांना अजूनही माहीत आहे.मग तरीही ब्रेकिंग न्यूज, सणसणीत काहीतरी देण्याच्या चढाओढीत असणारे हे काही पत्रकार गांजा ओढून की दारू ढोसून छाती ठोकपणे अश्या बातम्या देतात?

- महेश टिळेकर

 

टॅग्स :सुलोचना दीदीसेलिब्रिटी