प्रियदर्शन जाधव करणार मस्का या चित्रपटाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:38 IST
कलाकारांनी दिग्दर्शनाकडे वळणे यात काही नवीन नाही. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सध्या दिग्दर्शन क्षेत्रात उतरले असून त्यांनी या क्षेत्रात ...
प्रियदर्शन जाधव करणार मस्का या चित्रपटाचे दिग्दर्शन
कलाकारांनी दिग्दर्शनाकडे वळणे यात काही नवीन नाही. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सध्या दिग्दर्शन क्षेत्रात उतरले असून त्यांनी या क्षेत्रात देखील आपले नाव कमावले आहे. प्रसाद ओकचा कच्चा लिंबू, पुष्कर श्रोतीचा उबंटू या चित्रपटांना नुकतेच प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. प्रसाद आणि पुष्करनंतर आता आणखी एक अभिनेता मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रियदर्शन जाधव आता एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शन ही गोष्ट प्रियदर्शनसाठी नवीन नाहीये. प्रियदर्शनने याआधी गांधी आडवा येतो, मोरुची मावशी, मिस्टर अँड मिसेस, जागो मोहन प्यारे यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर आता ती मस्का या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या पोस्टरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. मस्का या चित्रपटाच्या पोस्टवरमध्ये एक प्लेट दिसत असून त्यामध्ये पैसे आणि त्यावर हार्ट शेपमधील ब्रेड आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहरे, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, प्रणव रावराणे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन्स आणि स्वरूप क्रिएशन अँड मीडिया प्रा. लिमिटेड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मोरेश्वर प्रॉडक्शनने केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच प्रियदर्शनने या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रियदर्शनने विजय असो, चिंटू २ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. पण टाईमपास २ या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली दगडूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तसेच त्याने हलाल या चित्रपटात देखील खूप चांगली भूमिका साकारली होती. चुक भूल द्यावी घ्यावी या मालिकेतील त्याची भूमिका तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्याचा सायकल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Also Read : ‘दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायला आवडते’- प्रियदर्शन जाधव