Join us  

‘बाजी सर्जेराव जेधे’ साकारणार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 5:55 PM

अभिनेता-लेखक-दिग्दर्शक अशी ओळख असलेला दिग्पाल लांजेकर ‘फत्तेशिकस्त’ च्या निमित्ताने एकाच वेळी दिग्दर्शक व अभिनेता अशा दोन परस्पर वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अभिनेता-लेखक-दिग्दर्शक अशी ओळख असलेला दिग्पाल लांजेकर ‘फत्तेशिकस्त’ च्या निमित्ताने एकाच वेळी दिग्दर्शक व अभिनेता अशा दोन परस्पर वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वराज्यनिष्ठ सरदार बाजी सर्जेराव जेधे यांची भूमिका तो ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात साकारणार आहे.

फत्तेखानाच्या छावणीवर गनिमी हल्ला करत मराठ्यांचा जरीपटका वाचवणारे ‘समशेरबहाद्दर’ बाजी जेधे हे कान्होजी जेध्यांचे पुत्र! बेलसरच्या झुंजात मर्दुमकी गाजवल्याबद्दल महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. त्यांनतर बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’. ‘ह्यो हात न्हवं... दुस्मनाचं रगात पिनारा दुधारी पट्टा हाय...राजांकडं नुसती नजर जरी वाकडी क्येली तरी मुंडकं उतरवून ठिवंन... गनिमाला फाडणारी शिवरायांची दुधारी तलवार सरदार बाजी सर्जेराव जेधे’... अशाच जोशपूर्ण आवेशात ही भूमिका चित्रपटात पहायला मिळणार आहे.

दिग्पालचा ऐतिहासिक गोष्टींचा दांडगा अभ्यास आहे. ‘फर्जंद’ च्या यशानंतर ‘फत्तेशिकस्त’ मधून भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा इतिहास तो उलगडणार आहे. एकाच वेळी दिग्दर्शक व अभिनेता अशा दोन वेगळ्या भूमिका साकारत असल्यानं आनंदासोबत जबाबदारी ही असल्याचं दिग्पाल सांगतो. ‘फर्जंद’ प्रमाणे ‘फत्तेशिकस्त’ चाहत्यांसाठी ऐतिहासिक पर्वणी असेल असा विश्वास दिग्पाल व्यक्त करतो.

ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे.

संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. १५ नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :फत्तेशिकस्त