Join us  

'जंगजौहर'च्या नावात झाला बदल 'पावनखिंड' नावाने प्रदर्शनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 5:41 PM

'ते फकस्त ६०० व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे.

पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर रोमांच उभे करणारा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय आहे. शालेय जीवनापासूनच आपण इतिहासाच्या पुस्तकात पावनखिंडीतील बाजीप्रभूंनी गाजवलेल्या पराक्रमाचे धडे वाचलेले आहेत. पावनखिंडीतील शौर्यगाथा आणि तिथल्या थराराची गाथा इतिहासाच्या पानापानांमध्ये आपण वाचली, ऐकली आहे.

 

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' नावाचा चित्रपट घेऊन येत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मुहूर्तापासून कायम चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बाजीप्रभूंचा पराक्रम रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासंदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला. चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 'जंगजौहर' हे या चित्रपटाचं शीर्षक बदलून आता 'पावनखिंड' करण्यात आलं आहे. यासोबतच हा चित्रपट येत्या १० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. 

पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरली होती. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ केली. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झालेली ही खिंड पुढे ‘पावनखिंड’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळं ‘पावनखिंड’ हा शब्द आपल्याला अधिक जवळचा वाटतो.

'जंगजौहर' या चित्रपटासाठीही 'पावनखिंड' याच शीर्षकासाठी प्रयत्न सुरू होते, पण एका अन्य निर्मात्यांनी या टायटलची नोंदणी केली होती. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक 'जंगजौहर' ठेवण्यात आलं होतं. मात्र अलीकडच्या काळात अशा काही घडामोडी घडल्या की, ज्या निर्मात्यांच्या नावावर हे टायटल होतं त्यांनी 'जंगजौहर'ला 'पावनखिंड' हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली. 

'जंगजौहर'पेक्षा 'पावनखिंड' हे शीषक चित्रपटाच्या विषयाला अनुरूप आणि पूरक वाटल्यानं दिग्पाल आणि निर्मात्यांनी जणू शिवरायांचा प्रसाद मानून हे शीर्षक आपल्या चित्रपटाला बहाल केले आहे. शिवप्रेमींसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. आता हा चित्रपट 'पावनखिंड' या नावाने प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा  भलामोठा फौजफाटा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे दिग्पालच्या व्हिजनमधून पडद्यावर अवतरणारी 'पावनखिंड'ची शौर्यगाथा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवेल असा विश्वास आहे.

 

पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम १० जूनला चित्रपटगृहांमध्ये पहायला मिळणार आहे. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेने छायांकन केले असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजीने दिले आहे. 'ते फकस्त ६०० व्हते' असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता 'पावनखिंड' या नावाने पहायला मिळणार आहे.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरफत्तेशिकस्त