Join us

​माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 12:41 IST

बकेट लिस्ट या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये तिच्यासोबत वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे आपल्याला पाहायला मिळत आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये तिच्यासोबत वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. स्वतःच्या दैनंदिन आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असलेल्या एका महिलेची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. या चित्रपटात माधुरी प्रेक्षकांना माधुरी सानेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची… आपल्या सगळ्यांची,’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून सई या व्यक्तिरेखेचा माधुरीच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेला बदल या चित्रपटात दाखवला जाणार आहे. बकेट लिस्ट या चित्रपटाच्या टीझरमध्ये सई या नावाचा उल्लेख झालेला असला तरी ही सई आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळत नाहीये. या सईमुळे माधुरीच्या आयुष्याला एक वळण मिळणार आहे. त्यामुळे ही सई चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार हे आपल्या लगेचच लक्षात येत आहे. पण सईच्या भूमिकेत कोण असणार हे कळण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. रेणुका शहाणे या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत असल्याने तीच तर सई नाही ना अशी उत्सुकता लागली आहे. Also Read : ​माधुरी दीक्षितने तेजाब या चित्रपटाच्या वेळेचा शेअर केला अनुभवबकेट लिस्ट या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे.ब्लू मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.