Join us  

'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:12 PM

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात

ठळक मुद्देशिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करतेय.

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी प्रख्यात कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत, म्हणूनही या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाचे तिसरे गाणे “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं....” रिलीज करण्यात आले. हे गाणे डॉ सलील कुलकर्णी यांचे पुत्र शुभंकर यांनी गायले आहे, हे त्याचे वैशिष्ट्य. 

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं....माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी वाऱ्याला...” हे गाणे निर्मात्याने नुकातेच प्रकाशित केले. १४ वर्षीय शुभंकर सलील कुलकर्णी याने हे गाणे गायले आहे. त्याने वयाच्या केवळ सातव्या वर्षी ‘चिंटू’ या मराठी चित्रपटात पहिले गाणे गायले होते. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे. प्रसेनजीत हा जेव्हा ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये सहभागी झाला होता त्यावेळी डॉ सलील कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी प्रसेनजीतला त्यावेळी स्वतंत्र गाणे गाण्याची संधी देण्याचा शब्द दिला होता, तो या माध्यमातून पूर्ण केला आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, आलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर,प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत,शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं ह....” हे गाणेही त्यातीलच एक आहे. याआधी प्रकाशित करण्यात आलेल्या याधीच्या दोन्ही गाण्यांना आणि टीझरला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

 

टॅग्स :वेडिंग चा शिनेमामुक्ता बर्वेसलील कुलकर्णी