Join us  

दीप्ती भागवतने 'गजर किर्तन'मुळे सकारात्मक वातावरणाचा घेतला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 8:00 AM

झी टॉकीज वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम गजर किर्तनने नुकताच २ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती भागवत करते.

झी टॉकीज वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम गजर किर्तनने नुकताच २ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती भागवत करते. या कार्यक्रमामुळे सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेतला असल्याचे दीप्ती सांगते.

दीप्ती भागवतने गजर किर्तन कार्यक्रमाबद्दल सांगितले की, एखादे कार्य आपण करावे ही आपली इच्छा तर असतेच, पण कधी कधी ते कार्य आपल्याकडून घडावे अशी परमेश्वरी इच्छाही असते. आज २ वर्ष पूर्ण करून तिसऱ्या वर्षातही मी हा कार्यक्रम करू शकते आहे, ते या परमेश्वरी इच्छेमुळेच असावे. एकदा कुणीतरी म्हटले होते की आपण कुठे असावे, काय करावे ही योजना आधीच आखून ठेवलेली असते. 'गजर किर्तनाचा'सारख्या अद्वितीय कार्यक्रमासाठी भगवंताने माझी निवड केली यासाठी मी अत्यंत कृतार्थ आहे.

तिने पुढे एका कार्यक्रमात सांगितले की, मागच्या आषाढीला सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे एका तरुणाने चक्क पायावर लोटांगण घातले. मला थोडेसे अवघडल्यासारखे झाले. त्याच्यासोबत त्याचा कॉलेजचा ग्रुप होता. कॉलेजला जाण्याआधी कार्यक्रम आवर्जून बघत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या विचारांत परिवर्तन होते, जगण्याची दिशा सापडतेय असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम कधीही संपवू नका अशी विनंतीदेखील केली. म्हणजे तरुण पिढी सुद्धा आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करते आहे यात शंका नाही. म्हणूनच, किर्तनकला कायम टिकून राहील. 

झी टॉकीज'वरील 'गजर किर्तनाचा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ग्रामीण महाराष्ट्र पाहिला. खरे सांगायचे तर, हा कार्यक्रम नसता तर तीर्थक्षेत्र, मंदीरे वगैरेंना मी कधीच भेट दिली नसती. कोकण, शिर्डी, जुन्नर, नाशिक, पुणे अशी कितीतरी नावे घेता येतील.

या सगळ्यात माझे लाडके ठिकाण आहे, ते म्हणजे आळंदी! इंद्रायणीच्या काठावर, भर थंडीतदेखील पखवाजाचा रियाज करणारी मंडळी पाहिली आहेत. इथल्या सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेतल्याशिवाय यातील खरी मजा कळणारच नाही, असे दीप्तीने सांगितले.