Join us  

दुसऱ्यांदा अनुभवायला मिळणार डॅडींचा दरारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 7:15 AM

मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुव्हीजचा 'दगडी चाळ २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देहा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे, त्या 'डॅडीं'ची कन्या योगिता गवळी खुद्द या सिनेमाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता 'दगडी चाळ २' ही प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, यात शंकाच नाही.

2015 साली प्रदर्शित झालेला दगडी चाळ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा, कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची गाणी सगळेच प्रेक्षकांना भावले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना आता या चित्रपटाचा दुसरा भाग पाहायला मिळणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतही आता सुपरहिट चित्रपटांचा सिक्वेल बनवण्याची प्रथा हळूहळू रूढ होऊ लागली आहे. संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दगडी चाळ' या चित्रपटाला नुकतेच घवघवीत यश मिळालं. गॅंगवॉर हा जरी चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी हळूवार फुलत जाणारी प्रेमकथाही त्यात होती. चित्रपटाचे रोमांचकारी कथानक, दमदार संवाद, सुमधुर गीते आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्याच गोष्टी अतिशय उत्तम जुळून आल्या होत्या. 

मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुव्हीजचा 'दगडी चाळ २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. शिवाय या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे, त्या 'डॅडीं'ची कन्या योगिता गवळी खुद्द या सिनेमाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता 'दगडी चाळ २' ही प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, यात शंकाच नाही. अर्थात या चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी या चित्रपटाची निर्मितीही संगीता अहिरच करणार आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणे 'दगडी चाळ २'चं दिग्दर्शनही चंद्रकांत कणसे करणार असल्याने पुन्हा प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'दगडी चाळ २' या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अंकुश चौधरी पाहायला मिळेल अशी आशा त्याचे फॅन्स नक्कीच करत असणार.  

टॅग्स :अंकुश चौधरी