Join us  

Coronavirus: कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी एकवटले मराठी कलाकार, सर्वांना केली ही कळकळीची विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:30 AM

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकवटले आहेत.

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे. त्यात रविवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू केले आहे. यामुळे एक प्रकारे शहरी भाग ‘लॉक डाऊन’ करण्यात आला आहे. तरीदेखील काही लोक याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून एक व्हिडिओ तयार करून त्यातून त्यांच्या चाहत्यांना व लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचनेसोबतच घरी थांबण्याचे व सरकारला सहाकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हणजेच स्वप्नील जोशी, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडीत, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, भरत जाधव, रवी जाधव, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, अभिजीत खांडकेकर आणि सचिन पिळगांवकर यांनी जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून मेसेज दिला आहे.

या व्हिडिओतून त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. यावर उपचार होत असून संपूर्ण शासकीय यंत्रणा यावर राबत आहेत. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा व काही संघटना यावर कार्यरत आहेत. अशावेळी काही नियमांचे पालन केले पाहिजे, असे ते सांगत आहेत. पुढे ते म्हणाले की, जनता कर्फ्यूला खूप चांगला प्रतिसाद दिला. मात्र किमान दोन आठवडे काळजी घेण्याची गरज आहे. व्यक्तिगत स्वच्छता, सध्यातरी घरचा आहार घ्या. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार आदेश देत नाही तोपर्यंत घराबाहेर पडले नाही पाहिजे. आपल्याला ताप, सर्दी व खोकला हा त्रास होत असल्यास दुसऱ्या कोणत्याही माणसाच्या संपर्कात न येता थेट डॉक्टर्शी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या व्हायरसला घाबरू नका जागरूक व्हा. काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्याचीही. कोरोना प्राण्यांमुळे होतो अशा गैरसमजामुळे लोकांनी त्यांच्या पाळीवर प्राण्यांना रस्त्यावर सोडले आहे. कृपया करून आपल्या पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नका, असेही या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यास्वप्निल जोशीसुबोध भावे सोनाली कुलकर्णीमुक्ता बर्वेतेजस्विनी पंडितअमेय वाघअवधुत गुप्ते प्रसाद ओक अमृता खानविलकरअभिजीत खांडकेकर