Join us  

CoronaVirus: कोरोनाच्या वादळात प्रशांत दामलेंनी दिला ह्यांना मदतीचा हात

By अजय परचुरे | Published: March 17, 2020 10:40 AM

अभिनेते ,निर्माते प्रशांत दामले यांच्या या मदतीमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देप्रशांत दामलेंनी आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिलेला आहे

एक जबाबदार आणि आपल्या सहकाऱ्यांची उत्तम काळजी घेणारे निर्माते आणि अभिनेते म्हणून प्रशांत दामले ह्यांची ख्याती आहे. कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर आलेलं सावट पाहता प्रशांत दामले यांनी आपल्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या रंगमंच कामगारांना या कठीण प्रसंगात मदतीचा हात देऊन समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. प्रशांत दामलेंनी आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिलेला आहे, एकूण २३ जणांना प्रत्येकी रुपये १०,०००/- प्रमाणे वाटप नुकतेच केले. 

कोरोनामुळे नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही नाट्यगृहात सध्या खबरदारी म्हणून नाटकाचा एकही प्रयोग होत नाहीयेे. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल ह्याची अजून खात्री नाहीये पण तो पर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशांत दामले ह्यांनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. ह्या 23 जणांना ही मदत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक दिलासादायक भाव होते. 

प्रशांत दामलेंप्रमाणेच रंगमंच कामगार संघटनेनेही आपल्या रंगमंच कामगारांना मदतीचा हात दिला आहे. सोमवारी रंगमंच कामगार संघटनेने प्रत्येक रंगमंच कलाकाराला प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत केली आहे. ह्यामुळे करोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्य़ा रंगमंच कामगारांना यामुळे थोडा का होईना सुखद दिलासा मिळाला आहे.नाटकांचे प्रयोगच ठप्प झाल्याने या नाटकांच्या प्रयोगावर पोट असणाऱ्या किमान 700 कामगारांना नाटक बंद राहिपर्यंत हलाखीचे दिवस जगावे लागत होते. मात्र या रंगमंच कलाकारांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघटना एक पालक म्हणून भक्कमपणे उभी राहिली.