‘अपराध मीच केला’चा मुहूर्त संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:11 IST
सध्या मराठी रंगमंचावर अनेक वेगळे आशय असलेली नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळतात. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार म्हणून सुपरिचित ...
‘अपराध मीच केला’चा मुहूर्त संपन्न
सध्या मराठी रंगमंचावर अनेक वेगळे आशय असलेली नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळतात. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लेखक, नाटककार, गीतकार म्हणून सुपरिचित नावं म्हणजे मधुसूदन कालेलकर. सहज सुंदर भाषा आणि पकड घेणारे संवाद असलेल्या त्यांच्या अनेक चित्रपट आणि नाटकांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘अपराध मीच केला’ हे त्यापैकीच त्यांनी लिहिलेलं गाजलेलं नाटक. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची तब्बल ५२ वर्षानंतर ‘किवि प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून पुनर्निर्मिती होतेय.‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ व ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीने ‘अपराध मीच केला’ हे गाजलेलं सलग तिसरे नाटक नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येताहेत. ‘अपराध मीच केला’ नाटकातील सर्व कलावंतांच्या उपस्थितीत नुकताच मुहूर्त करून तालमीचा श्रीगणेशा करण्यात आला. आत्माराम भेंडे दिग्दर्शित या गाजलेल्या नाटकाचे आता नव्या संचात दिग्दर्शन विजय गोखले करीत आहेत. या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा त्याकाळी अभिनेते अरुण सरनाईक यांनी लोकप्रिय केली होती. नव्या संचात ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर साकारणार आहेत. त्यांच्या सोबत निशा परुळेकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, संजय क्षेमकल्याणी, स्वतः किशोर सावंत, सोनाली बंगेरा, विलास गुर्जर, यश जोशी (बालकलाकार), शिर्सेकर यांच्या भूमिका आहेत. गोट्या सावंत या नाटकाचे सुत्रधार म्हणून आणि प्रविण दळवी हे व्यवस्थापक म्हणून काम पहाणार आहेत. नव्या वर्षात ‘अपराध मीच केला’ नाटक रंगभूमीवर येणार आहे.