Join us  

'शिवा' चित्रपटाचा म्युझिक व ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:13 PM

"शिवा - एक युवा योद्धा" सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला.

ठळक मुद्दे शिवा (सिद्धांत मोरे) आणि त्याच्या एकंदर प्रवासाची कथा  "शिवा - एक युवा योद्धा" सिनेमात

 "शिवा - एक युवा योद्धा" सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर आणि माझी सहेली मासिकाचे संपादक दीपक खेडकर, एसजीएस फिल्म्स्चे निर्माते व्ही डी शंकरन, डॉ. संजय मोरे आणि गणेश दारख, दिग्दर्शक विजय शिंदे, दमदार आणि कडक अंदाजात भेटीला येणारा शिवा म्हणजेच सिद्धांत मोरे, गीतकार बाबासाहेब सौदागर तसेच चित्रपटातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या 'शिवा' सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला.या सिनेमाची कथा शिवा (सिद्धांत मोरे) आणि त्याच्या एकंदर प्रवासाची आहे. शिवाच्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आचरणात आणत त्याने उत्तम माणूस आणि योद्धा बनून केलेली वाटचाल सिनेमात दाखविली आहे. या सिनेमात शिवा ही प्रमुख भूमिका निभावणारा सिद्धांत मोरे म्हणतो, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिलं तर बॉडीबिल्डिंग प्रमाणे सिनेक्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली आहे. त्यांना मिळालेले चाहत्यांचं प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. शिवा या सिनेमाला देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल ही आशा आहे. 

लेखक संजय मोरे यांनी अडीच वर्ष परिश्रम घेत या सिनेमाचे लेखन केले आहे. या सिनेमात निव्वळ मनोरंजन नाही तर सामाजिक परिस्थितीचं भान ही राखले गेले आहे. दुष्काळात शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि त्यावर शासनाकडून मदतीच्या नावाखाली केली जाणारी थट्टा सिनेमात नेमकेपणाने मांडली आहे. व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला कोणताही उपदेशाचा डोस न देता तरुणांची नेमकी नस ओळखून सिनेमात या समस्येवर बोट ठेवलं गेलं आहे. अॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं कम्प्लिट पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार ("आय" सिनेमा फेम) कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहेत.  संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी सिनेमात एकूण ५ गाणी दिली आहेत. वेगवेगळ्या धाटणीची ही पाचही गाणी मनाचा ठाव घेणारी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं 'प्रलय भयंकर' हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल सॉंग ऐकण्याचा योग येणार आहे. गायक सागर फडके यांच्या दमदार आवाजातील 'खांद्याला खांदा लावून' हे प्रेरणादायी गाणं देखील तितकंच जोशपूर्ण आहे. गायक रुपाली मोघे आणि सागर फडके यांच्या आवाजातील तुफान गाजेल असं 'एन्जॉय करू' हे झिंग चढवणारं आयटम सॉंग थिरकायला लावणारं आहे. महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याच्या सुमधुर आवाजात 'साजणी' या मन मोहून टाकणाऱ्या  प्रेमगीताने सिनेमात चारचाँद लावले आहेत. जीवनात चालणारा ऊन सावलीचा खेळ गायक कृष्णा बोंगाने याने त्याच्या आर्त आवाजात नेमकेपणाने सादर केला आहे. त्याने गायलेल्या 'ऊन सावली' या गाण्याचे बोल हे आयुष्यातील आव्हानात्मक परिस्थितीवर भाष्य करणारे असल्याने ते थेट काळजाला भिडतात. 'शिवा' सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.