Join us  

कॉलेज विश्वाची पण वेगळ्या धाटणीची गोष्ट 'गॅट मॅट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 8:00 AM

कॉलेज विश्वावर आधारित सिनेमाचा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीत आलेला आहे. कॉलेजमधल्या लव्हस्टोरीज, निवडणुकीचे वातावरण, यश-अपयश हे मराठी प्रेक्षकांनी सिनेमात पाहिले आहे.

ठळक मुद्दे'गॅट मॅट' हा सिनेमा कॉलेज विश्वावर आधारित असला तरी काहीसा वेगळा आहे

कॉलेज विश्वावर आधारित सिनेमाचा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीत आलेला आहे. कॉलेजमधल्या लव्हस्टोरीज, निवडणुकीचे वातावरण, यश-अपयश हे मराठी प्रेक्षकांनी सिनेमात पाहिले आहे. 'गॅट मॅट' हा सिनेमा कॉलेज विश्वावर आधारित असला तरी काहीसा वेगळा आहे. गॅटमॅट जुळवण्याचे (दोन प्रेमवीरांना एकत्र आणण्याचे) काम आपल्या कॉलेजमध्ये अनेकांनी केले असेल. यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. हा सिनेमा सर्वत्र आज प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने या सिनेमाच्या टीमने नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली.  

सिनेमाची कथा निखिल वैरागरने लिहिली आहे. तो सांगतो, "गावाकडून शिक्षणासाठी शहरामध्ये आलेल्या रंग्या आणि बगळ्या या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. यातील बगळ्याची भूमिका मी स्वतः करत असून रंग्याची भूमिका अक्षय टंकसाळे साकारली आहे. शहरात पैसे कमवायचे असतील तर काहीतरी शक्कल लढवली पाहिजे असे दोघांना वाटत असते. रंग्या आणि बगळ्याच्या लक्षात येते की, कॉलेजमध्ये श्रीमंत घरातील मुले आहेत पण मुलींवर आपली छाप पाडून त्यांना कसे पटवायचे हे त्यांना माहित नाही. मग हे दोघे अशा मुलांचे गॅटमॅट जुळवायला मदत करतात." 

अक्षय टंकसाळे म्हणाला, "आजवर मी अनेक बोल्ड भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एका लाजाळू मुलाची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. शहरी जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी गॅटमॅट जुळवण्याचे काम करता करता एका टप्प्यावर पैशांपेक्षा कुणाचेतरी धागे आपल्यामुळे जुळत आहेत याचे समाधान महतवाचे वाटू लागते. गावाकडून शहरात आल्यावर वातावरणाशी जुळवून घेतानाच रंग्या आणि बगळ्याचा प्रवास नक्कीच पाहण्याजोगा आहे. हे गॅटमॅट त्यांना कसे जीवनाची दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे." 

अवधूत गुप्ते या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता असून त्याने या चित्रपटात एक गाणेदेखील गायले आहे. बॉईज आणि बॉईज २ या चित्रपटांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर याच धाटणीचा 'गॅट मॅट' हा चित्रपटदेखील यश मिळवेल असा विश्वास वाटतो, असे तो म्हणाला. मराठी तरुण रसिक प्रेक्षकांना जे हवे आहे ते या माध्यमातून  दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पूर्णिमा डे ही या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, सिनेमातील अतुल तोडणकर, संजय खापरे,  उदय टिकेकर या दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, असे ती सांगते. ती या सिनेमात ईशा हे पात्र साकारत असून साध्या स्वभावाची ईशा पुण्यासारख्या शहरात शिक्षण मोठ्या कॉलेजात शिकत असते. गावाकडे राहणाऱ्या आईला तिला पैसे पाठवायचे असतात त्यासाठी ती रंग्या बगळ्याबरोबर मिळून काम करते. 

एका मालिकेमुळे रसिका सुनील प्रचंड चर्चेत होती. मालिका सोडल्यावर लगेचच या चित्रपटातून 'काव्या'च्या ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मित्रमैत्रिणींना आधार देण्याचे काम ती करत असते. अतिशय श्रीमंत पण तरीही विनम्र स्वभावाची काव्या या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. युवापिढीची रोमेंटिक दुनिया सादर करणाऱ्या या सिनेमामध्ये पलक गंगेले ही ग्लॅम अभिनेत्रीदेखील सिनेमात झळकणार आहे.  

कॉलेज तरुणाईला आपलंसं करणारा अवधूत गुप्ते याच्या आवाजातील  'गॅट मॅट' सिनेमाचे शीर्षक गीत असो, वा सिनेमातील सुप्रसिद्ध हिंदी रॅपर बाबा सेहगल आणि जुईली जोगळेकरने गायलेले  'एक पेग दोन पेग' हे धम्माल पार्टी सॉंग असो, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभला आहे. तसेच, आनंद शिंदे यांच्या आवाजातील 'वरात' हे धम्माल गाणं देखील या सिनेमात आहे. समीर साप्तीस्करने संगीतदिग्दर्शन केलेली या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

टॅग्स :रसिका सुनिल