Join us  

'कॉलेज डायरी' सांगणार गाथा एका पॅशनेट दिग्दर्शकाची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 6:30 AM

'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्दे'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित

स्वप्ने सगळेच पाहतात पण पूर्ण मात्र काहींचीच होतात. स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यासारखे सुख ते दुसरे कुठले, हे त्याला कळले ज्याने ते सर्वार्थाने जगले. आपली ध्येय... आपली जिद्द... आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा दुर्दम्य आशावाद असतो तो स्वप्नांत. ही वेडी आशा आपल्याला पछाडून सोडते आणि मग सुरु होतो एक धाडसी प्रवास. खाचखळग्यांचा, वळणा-वळणांचा, एखाद्या मृगजळाप्रमाणे मग आपण त्या स्वप्नांमागे धावू लागतो. अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकानेही असाच काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्यानिमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजनक्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी प्रत्येक कलावंत तळमळत असतो. अनिकेत ही त्यातलाच एक पण अंगीभूत गुण-कौशल्य आणि दुर्दम्य इचछाशक्तीने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. स्वप्नांमागे धावताना पाय पोळले तरी चालतील पण स्वप्नं कवेत घेणारच असा निश्चयच जणू त्याने आपल्या गाठीशी बांधून ठेवलेला. 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्याचे स्वप्ने तर प्रत्यक्षात साकारलं पण त्यामागील प्रवास प्रचंड कष्टप्रद आहे. दिग्दर्शनाची दोर हाती घेत सगळे युनिट सांभाळणे ही साधी गोष्ट नसून वेळोवेळी पदरमोड करीत या चित्रपटाला त्याने सांधले. प्रसंगी आई-बहिणींचे दागिने गहाण ठेवत कधी व्याजावर पैसे घेत त्याने या चित्रपटासाठी निर्माते भावेश काशियानी यांनाही पाठिंबा दिला. अचानकच काही निर्मात्यांनी बॅकआऊट केल्यावर दिग्दर्शक अनिकेतची जबाबदारी आणखी वाढली होती. एकाचवेळी चित्रपटाची धुरा तर दुसरीकडे चित्रपटासाठी फायनान्स मिळवणे अशी त्याची काहीशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्थाच झाली होती म्हणा ना. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अनिकेत न डळमळता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत होता.चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रनिंग इक्विपमेन्टवर काम करीत असताना त्याच्या पाठीला दुखापत झाली जी पुढे जाऊन जीवघेणी ठरू शकली असती त्याचीही अनिकेत ने जराही पर्वा केली नाही विशेष म्हणजे त्याचा अजिबात बाऊ न करता शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. पाठीचे दुखणे सहन होई ना तरीही डॉक्टरांचा सक्तीचा बेडरेस्टचा सल्ला न जुमानता हा पठ्ठया पाठीवर स्प्रेचा वापर करीत आणि शूटवर जात असे. तब्ब्ल ३०० स्प्रे बॉटल्सचा वापर या दरम्यान त्याने केला जे केवळ सेटवरील अनिकेतच्या ३ मित्रांना माहित होते. ध्येयवेड्या महत्त्वाकांक्षी अनिकेतला त्याचे स्वप्न साकार करण्यापासून कुणीच अडवू शकत नव्हते हे त्याने 'कॉलेज डायरी' चित्रपटाद्वारा सिद्ध केले आहे. अडचणींचा डोंगर पार करत झालेला अनिकेतच प्रवास इथेच थांबत नाही तर आत्ता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून त्याच्या या प्रयत्नांना प्रेक्षकसुद्धा पसंतीची पावती देतील यात काही शंका नाही. 

टॅग्स :कॉलेज डायरी