चॅलेंज या नाटकाचा लवकरच होणार रौप्य महोत्सवी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 11:06 IST
प्रेक्षकांकडून दाद मिळणे, कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, हे कोणत्याही कलाकृतीसाठी, कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते.जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती ...
चॅलेंज या नाटकाचा लवकरच होणार रौप्य महोत्सवी प्रयोग
प्रेक्षकांकडून दाद मिळणे, कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, हे कोणत्याही कलाकृतीसाठी, कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते.जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून जातात आणि त्या कलाकाराला त्याच्या कामाची खरी पावती देतात, त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करतात,तेव्हा रसिकांना 'माय बाप मानणार्या कलाकाराला सुद्धा त्याच्या कामाचं, कष्टाचं, चिज झाल्यासारखं वाटतं. चॅलेंज या नाटकाच्या बाबतीत असेच काहीसे घडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चॅलेंज हे नाटक सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या नाटकाला मिळत आहे. या नाटकामध्ये दिग्पाल आणि निखिल राऊत मुख्य भूमिकेत आहेत. निखिल या नाटकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची तर दिग्पाल क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांची भूमिका साकारत आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग उद्या म्हणजेच १३ मेला माटुंग्यातील यशवंतराव नाट्य सभागृहात होणार आहे. प्रेक्षकांनी चॅलेंज या नाटकाला दिलेल्या प्रेमाबाबत दिग्पाल प्रचंड खूश आहे. तो सांगतो, मराठी नाटकाला प्रेक्षकांची संख्या कमी असते आणि त्यातही ऐतिहासिक नाटकांना प्रेक्षक पसंती देत नाही असे म्हटले जाते. पण आमच्या नाटकाने या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्याचे ठरवले आहे. आमचे चॅलेंज हे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नाटक संपल्यानंतर प्रेक्षक मला, निखिलला, आमच्या नाटकाच्या संपूर्ण टीमला आवर्जून येऊन भेटतात आणि आमच्या कामाचे कौतुक करतात. एकदा नाटक बघितलेले रसिक देखील पुन्हा पुन्हा या नाटकासाठी येत आहेत. आमच्या नाटकाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. चॅलेंज हे क्रांतिकारकांच्या मैत्रीचे युथफूल नाटक असून या नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आहेत. मुक्ताने याआधी ढाई अक्षर प्रेम के, कोडमंत्र यांसारख्या नाटकाची निर्मिती केली आहे. अनामिका निर्मित साईसाक्षी प्रकाशित चॅलेंज या नाटकाचा मुहूर्त दीनानाथ नाट्यगृहाच्या वाचनालयात संपन्न झाला होता. ढाई अक्षर प्रेम के नंतर दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे आणि लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचे चॅलेंज हे दुसरे नाटक आहे. 'चॅलेंज' मध्ये निखिल आणि दिग्पालसोबत दीप्ती लेले, ज्ञानेश वाडेकर, शार्दूल आपटे, सुयश पुरोहित, तुषार साळी, तेजस बर्वे, जयेंद्र मोरे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.Also Read : फर्जंद चित्रपटाचा पहिला टीझर ठरला सर्वाधिक हिट