Join us  

आळंदीचा चैतन्य देवढे बनला लकी, लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 3:15 PM

सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. 

ठळक मुद्दे 'लकी' सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत करतोय पदार्पण'लकी' चित्रपट 7 डिसेंबरला होणार प्रदर्शित

संजय जाधवने 'दूनियादारी' सिनेमातून 'लिटील चॅम्प' रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता 'राइझिंग स्टार' चैतन्य देवढेलाही लाँच करत आहेत. सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. 

संजय जाधव ह्यांच्या दूनियादारी सिनेमातले पंकज पडघन यांनी संगीत दिलेले 'यारा यारा फ्रेंडशीपचा खेळ सारा' हे गाणे त्यावेळी रिएलिटी शो करणाऱ्या रोहितल राऊतला गाण्याची संधी मिळाली होती. आता दूसऱ्या गुणी गायकाला पून्हा एकदा संजय जाधव सिनेसृष्टीत लाँच करत आहेत. 'संगीत सम्राट', 'राइझिंग स्टार' आणि यंदा 'सूर नवा ध्यास नवा' अशा रिएलिटी शोमधून दिसलेला आळंदीचा चैतन्य देवढे ‘लकी’ बॉय ठरलेला आहे.  

चैतन्यच्या निवडी विषयी फिल्ममेकर संजय जाधव सांगतात, 'या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि वैभव चिंचाळकरने मला चैतन्यचे नाव सुचवले. चैतन्यला आवाजाचे दैवी वरदान लाभले आहे. त्याच्यातली निरागसता मला खूप भावली.'संगीतकार पंकज पडघन म्हणतात, 'नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजय दादांना नेहमीच आवडते. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात ह्या गाण्याचा रियाज करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. त्याचे मला खूप कौतूक वाटते.'चैतन्य देवढे म्हणतो, 'मी स्वत:ला खूप लकी समजतो की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.' 

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिमींग ट्वेंटीफोर सेव्हनची निर्मिती असलेला, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात अभय महाजन आणि दिप्ती सती मुख्य भूमिकेत आहेत. 'लकी' चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :संजय जाधव