Join us  

'बॉईज २' चित्रपटातील धमाल गाणे झाले प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 4:19 PM

'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हे दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत सामिल करून घेत आहेत.

ठळक मुद्दे'बॉईज २' सिनेमातील नवे गाणे 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' 'बॉईज २' चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हे दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत सामिल करून घेत आहेत. विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज'च्या धम्माल सिक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' हे गाणे सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील धमालमस्ती प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट एण्टरटेन्मेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

कॉलेज तरुणांना भुरळ पाडणाऱ्या या गाण्याचे बोल अवधूत गुप्तेने लिहिले असून उडत्या लयीच्या या गाण्याला संगीतदेखील त्यानेच दिले आहे. तसेच आदर्श शिंदे आणि रोहित राऊतने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. राहुल-संजीव जोडीचे दमदार नृत्यदिग्दर्शन असलेले हे गाणे प्रेक्षकांनाही बेभान नाचवण्यास यशस्वी ठरत आहे. या गाण्याबरोबरच, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचा डबल धमाका पाहण्यासाठीदेखील त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. 

शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या या तिघांची गोष्ट सांगणाऱ्या 'बॉईज २' चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, ऋषिकेश कोळीने संवादलेखन केले आहे. तसेच लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे.