Join us  

'बॉईज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 1:02 PM

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने गेल्यावर्षी किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित अनेक पैलू लोकांसमोर सादर केले.

ठळक मुद्देसुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडचा डबल धमाका दिसणार आहे

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने गेल्यावर्षी किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित अनेक पैलू लोकांसमोर सादर केले. नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलांच्या मानसिकतेचा वेध घेणाऱ्या या सिनेमातील धैर्या आणि ढुंग्याच्या कारनाम्याने तर, संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावले होते. इतकेच नव्हे तर, या सिनेमातील कबीरने किशोर मुलं आणि पालक यांमधील पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्नदेखील केला. शाळेतल्या होस्टेलमध्ये घडलेल्या या सर्व गमतीजमतीनंतर, आता ही तीन मित्र महाविद्यालयीन पायरी चढत आहेत.  ५ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या 'बॉईज' च्या या नव्या पर्वात आपल्या सर्वांचे लाडके बॉईज महाविद्यालयीन तरुण झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शाळेचे नियम धाब्यावर गुंडाळणारी ही अतरंगी मुलं आता कॉलेजच्या मोकाट वातावरणात काय दंगा करतात हे 'बॉईज २' मधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या, या युथफुल 'बॉईज २' मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडचा डबल धमाका दिसून येणार आहे. महाविद्यालयातील रंगबेरंगी दुनिया दाखवणाऱ्या या सिनेमात कॉलेज कॅम्पसमधील राडा आणि सिनियर ज्युनियरमधली ठसन तर दिसेलच पण त्याबरोबरच तरुणपिढीचा रोमान्सही आपल्याला पाहता येणार आहे. 'बॉईज २' सिनेमाची आणखीन एक खासियत म्हणजे, 'लग्नाळू' या गाण्याप्रमाणे या सिनेमातले 'गोटी सोडा बाटली फोडा' हे बेचलर साँगदेखील तरुणांना वेड लावून जात आहे. शिवाय, 'तोडफोड' या आयटम साँगने प्रसिद्धीचा उच्चांक मोडला असल्याकारणामुळे किशोरावास्थेतून तारुण्यात प्रवेश करणाऱ्या या 'बॉईज'ची धतिंगगिरी पुनश्च पाहण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक झाले आहेत. 

लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे, इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक वितरणदेखील केले जाणार असल्याकारणामुळे, ह्रीशिकेश कोळीचे संवाद असलेल्या या सिनेमातील शाब्दिक कोट्यांची मज्जा भारताबाहेरील प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे. 

टॅग्स :बॉईज २