Join us  

लेखक अभिनेता दिग्पाल लांजेकरच्या एकपात्रीवर बनणार पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 11:15 AM

दिग्पाल लांजेकरने सखी या मालिकेत काम केले होते तसेच तू माझा सांगाती या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. दिग्पालने ...

दिग्पाल लांजेकरने सखी या मालिकेत काम केले होते तसेच तू माझा सांगाती या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. दिग्पालने आज एक अभिनेता आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकत नसल्याने तो कुठे आहे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तो त्याच्या एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे म्हटले जात आहे. दिग्पालचा ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास प्रचंड आहे. अनेक संत, महापुरुष यांच्याविषयीचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्याने प्रचंड अभ्यास करून तू माझा सांगाती लिहिली होती आणि आता त्याने लिहिलेल्या एका एकपात्रीला पुरस्कार मिळाला असून या एकपात्रीचे रूपांतर आता एका पुस्तकात होणार आहे.दिग्पालने काही दिवसांपूर्वी संत मुक्ताबाई यांच्या आयुष्यावर एक एकपात्री लिहिली होती. ही एकपात्री त्याच्या भावाच्या मैत्रिणीने एका स्पर्धेत सादर केली होती. या स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला. ही एकपात्री सगळ्यांना खूपच आवडली होती. या एकपात्रीचे अनेकांनी कौतुक केल्यानंतर आता एका प्रकाशन हाऊसने ही एकपात्री पुस्तक रूपात आणायची ठरवली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने होणार आहे. याविषयी दिग्पाल सांगतो, "माझा संत मुक्ताबाई यांच्याविषयी खूप अभ्यास आहे. माझ्या भावाच्या मैत्रिणीला एका स्पर्धेत एकपात्री सादर करायची असल्याने तिने मला एखाही एकपात्री लिहायला सांगितली आणि त्यामुळे ही एकपात्री मी केवळ एका रात्रीत लिहिली. त्यावेळी एका रात्रीत मी 22 पाने लिहिली होती. ही एकपात्री सादर करायला तिला 1 तास 10 मिनिटे लागली होती. मला ही एकपात्री लिहिताना माझ्या अनेक वर्षांपासूनच्या अभ्यासाचा नक्कीच फायदा झाला."