Join us  

बॉलिवूडचा 'हा' फिल्ममेकर 'लकी'मधून करतोय मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 8:00 AM

निर्माते सुरज सिंग आपल्या बॉलीवूडमधल्या 17 वर्षांच्या करीयरनंतर आता मराठी सिनेसृष्टीत लकी सिनेमाव्दारे पदार्पण करत आहेत.

ठळक मुद्दे'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत.हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे

‘डर्टी पिक्चर’, ‘एम एस धोनी’ आणि ‘फ्लाइंग जाट’ ह्या सुपरहिट सिनेमांच्या निर्मितीत सक्रिय सहभागी असलेले निर्माते सुरज सिंग आपल्या बॉलीवूडमधल्या 17 वर्षांच्या करीयरनंतर आता मराठी सिनेसृष्टीत लकी सिनेमाव्दारे पदार्पण करत आहेत. सुरज सिंग ह्यांचे ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ वेबसीरिज, म्युझिक अल्बम्सच्या निर्मितीमध्ये सक्रिय आहे. त्यांची निर्मिती असलेले ‘तेरा घाटा’ गाणे 2018 मधल्या बॉलीवूड चार्टबस्टरवरचे सर्वाधिक प्रसिध्द गाणे आहे.

संजय जाधव आणि दिपक राणे ह्यांच्या ‘ड्रिमींग ट्वेंटी फोर सेवन’ ह्या प्रॉडक्शन हाऊससोबत आता सुरज सिंग ह्यांनी लकी सिनेमाची निर्मिती केली आहे. ह्याविषयी सुरज सिंग म्हणतात, “मुंबईत करीयर केल्यामूळे मराठी सिनेमाविषयी एक आपोआपच कनेक्ट निर्माण होतो. संजयदादा आणि माझी गेल्या काही वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये मराठी सिनेमाविषयक गोष्टी खूप असतात. आणि एक दिवस दादांनी मला लकीची कथा ऐकवली. ती मला खूप आवडली आणि मी ह्या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले.”  

सुरज सिंग लकी चित्रपटाविषयी सांगतात, “लकी ही आजच्या कॉलेज तरूणांची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त, स्वच्छंद आणि मनमौजी आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हांला अनेक अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील. संजयदादा निखळ मनोरंजन देणारे सिनेमे बनवतात. आणि हा त्यांच्याच धाटणीचा धमाल विनोदी चित्रपट आहे. “

 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :लकीसंजय जाधव