'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan ) 'झापुक झुपूक' चित्रपटाची (Zapuk Zupuk) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. डिसेंबर २०२४ मध्ये 'झापुक झुपूक' चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला 'झापुक झुपूक' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. त्यामुळे आता केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. अशातच आता 'झापुक झुपूक' चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
'झापुक झुपूक'चं शीर्षक गाणं प्रदर्शित प्रदर्शित झालं आहे. हे गाणं यावर्षाचं पार्टी साँग ठरलयं. मराठी रॅप आणि हिप-हॉप संगीत बनवणारा मराठमोळा कृणाल घोरपडे ऊर्फ क्रेटेक्स (Kratex) हा या गाण्याचा संगीतकार आहे. 'पट्या द डॉक'ने (Patya the Doc) हे गाणं गायलं आहे. तर गीतकार प्रतीक संजय बोरकर आहेत. या गाण्यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या नव्या गाण्यावर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी चित्रपटासाठी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कृणाल घोरपडे ऊर्फ क्रेटेक्स 'झापुक झुपूक'चं शीर्षक गाण्याबाबत म्हणाला की, "मला खात्री आहे की 'तांबडी चांबडी'प्रमाणे प्रेक्षकांना माझं हे 'झापूक झुपूक' गाणं सुद्धा नक्की आवडेल. माझं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल मी जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांचा खूप आभारी आहे. 'झापूक झुपूक' चित्रपटाच्या या शीर्षक गाण्यात मराठी तडका तर आहेच, पण एक जल्लोष आणि उत्साह आहे. जो तरुणांना आणि श्रोत्यांना गाण्याच्या तालावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल. सामाजिक कार्यक्रम, क्लब्स आणि पार्टीजमध्ये 'तांबडी चांबडी'प्रमाणेच 'झापूक झुपूक' हे गाणंही वाजत या वर्षीचं मराठीतील 'पार्टी साँग ऑफ द इयर' ठरण्याची अपेक्षा नाकारता येत नाही. कारण आता वाजतंय मराठी, गाजतंय मराठी, पेटलाय मराठीचा डंका!', या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्यात.