Join us  

भूषण प्रधान- पल्लवी पाटीलची फ्रेश जोडी ‘तू तिथे असावे’ सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 9:56 AM

प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असली तरी अलगद हळुवारपणे उलगडणारी ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतेच.

ठळक मुद्दे मल्हार आणि गौरीच्या प्रेमाची कहाणी ‘तू तिथे असावे’ या चित्रपटातून उलगडणार आहेभूषण प्रधान आणि पल्लवी पाटील ही फ्रेश जोडी चित्रपटात दिसणार आहे

प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असली तरी अलगद हळुवारपणे उलगडणारी ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतेच. अशा प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलेल्या मल्हार आणि गौरीच्या प्रेमाची कहाणी ‘तू तिथे असावे’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची निर्मिती असलेला हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेक अडचणी आणि विरोधांना सामोरे जाऊन गौरीच्या साथीने आपले स्वप्न साकारणाऱ्या जिद्दी मल्हारचा सुप्रसिद्ध गायक  होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. एखादा क्षण किंवा घटना आपलं आयुष्य क्षणार्धात बदलू शकते, अशावेळी फक्त खंबीरपणे पाठीमागे उभं राहणाऱ्या नात्याची गरज असते हे ‘तू तिथे असावे’ या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे.

भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत.

‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे.

जीतसिंग व प्रवीण सूर्यवंशी यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. वेशभूषा कैलाश ब्राम्हणकर यांची आहे. निर्मिती व्यवस्था संगीत गायकर तर कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत. सुश्राव्य संगीताने सजलेला ‘तू तिथे असावे’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 

टॅग्स :तू तिथे असावेभुषण प्रधानपल्लवी पाटील