विनोदबुद्धी आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर भाऊ कदम यांनी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत ते प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. सध्या ते त्यांच्या 'करुन गेलो गाव' या नाटकामुळे चर्चेत आहेत. या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगानिमित्त ते अनेक ठिकाणांना मुलाखती देत आहेत. काही दिवसांपूर्वी भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. विनोदाचा बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना भाऊ कदम भेटायला गेले होते. त्यावेळी अशोक सराफांनी भाऊ कदम यांना दिलेल्या वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. त्या व्हिडिओवर आता भाऊ कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भाऊ कदम यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं ते सांगितलं. ते म्हणाले, "मला वाटतं त्या फ्रेममुळे लोकांना तसं वाटलं असेल. माझ्या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर अशोक मामा तिथे आले होते. त्यानंतर तिथे त्यांचा प्रयोग होता. एकाने सांगितलं मामा आलेत, म्हणून मी पटकन मेकअप न काढताच त्यांना भेटायला गेलो. कारण, मला नंतर चला हवा येऊ द्याच्या शूटिंगसाठी जायचं होतं."
"मी घाईघाईत मेकअप काढून त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना मी नमस्कार केला. कसे आहात विचारलं. मी म्हटलं आता मी हवा येऊ द्याच्या शूटिंगसाठी चाललो आहे. त्यावर ते म्हणाले होते की कसं करता तुम्ही एवढं. आमच्यात एवढीच चर्चा झाली होती. मी मामांबरोबर गप्पा मारायला बसलोच नव्हतो. कारण, मलाच घाई होती. त्यामुळे मी पाया पडून निघालो. पण, लोकांना यात काय चुकीचं दिसलं, हे मला कळलंच नाही,"असंही पुढे भाऊ कदम म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं, "त्यांच्यासमोर कोण बसू शकतं? ते खूप मोठे कलाकार आहेत. त्यांना बघत आमची पिढी शिकली आहे. ते आमच्यासाठी देव आहेत. त्यांनी इतिहास घडवला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर बसणं, अशी इच्छा कोणालाच होणार नाही. मलाही झाली नाही. हो, पण मी त्यांच्या घरी असतो. तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं. चहा पाणी दिलं असतं, हे मी खात्रीने सांगू शकतो. मला घाई होती, म्हणून मी त्यांना भेटून पटकन निघालो.कृपया, आधी काय झालंय ते विचारा. कृपया असं करू नका. यामुळे गैरसमज निर्माण होतात. मामांबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे."