Join us  

भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:14 PM

ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 

ठळक मुद्देचित्रपटामध्ये इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहेचित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे

 ज्यांच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो. आपल्या शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना ज्यांनी खळखळून हसविले, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. सागर देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे...वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख मा.श्री. राज ठाकरे, वायाकॉम18 स्टुडीओज चे सीओओ, अजित अंधारे, निखिल साने व्यवसाय प्रमुख, मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम18, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, आणि चित्रपटाची संपूर्ण टीमच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला. वैशिट्य म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदाच एखादा चित्रपट दोन भागांमध्ये रीलीझ होणार आहे... म्हणजेच भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा पूर्वार्ध - ४ जानेवारी आणि उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र रिलीझ होणार आहे.   

ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचे आहे. चित्रपटामध्ये इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे. 

 चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “मी बायोपिक पहिल्यांदाच दिग्दर्शित केला, आणि तोसुद्धा महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वावर आधारीत असलेला. पु.ल.देशपांडे यांची ओळख विनोदी लेखक म्हणून जरी असली तरी त्यांनी कलेचे बहुतेक सर्व प्रांत गाजवलेले आहेत. पुलंनी निर्माण केलेल्या वल्ली आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत, पण त्यापलीकडे जाऊन पुलं हे प्रत्यक्ष आयुष्यात कसे होते त्याचं चित्रण मी या सिनेमात करायचा प्रयत्न केला आहे. सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यात असलेलं महत्त्व, मित्रांच्या संगतीत रमणारे पुलं, त्यांचं दातृत्व असे अनेक पैलू सिनेमात पाहता येतील. पुलंचं संगीतावर विशेष प्रेम होतं, त्यामुळे सिनेमातही गाण्यांना विशेष स्थान आहे, आणि त्याचं चित्रणही रसिकांना नॉस्टेल्जिक करेल अशी मला खात्री आहे.’

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सागर देशमुख म्हणाला, “एक नट कायमच वाट बघत असतो अशा एखाद्या भूमिकेची ज्यात त्याला त्याचं वर्चस्व ओतता येईल आणि मला अशा व्यक्तीची भूमिका मिळाली ज्यांना अवघ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतले... इतक्या उदंड प्रेम मिळालेल्या माणसाला साकारायचं कसं हा एक मोठा पोटात गोळा आणणारा प्रश्न माझ्यासमोर होता... मी पुन्हा एकदा त्यांची पुस्तके वाचायला लागलो. त्यांच्याबद्दल लिहिलेले आणि त्यांनी इतरांबद्दल लिहिलेले जास्त वाचले. स्क्रिप्ट मिळाल्यानंतर त्यांच्या वयाचे टप्पे ओळखले. त्यांच्या आयुष्यातील घटना समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण, त्यांचा आवाका इतका मोठा आहे कि विश्वास बसेना की एक माणूस लिहितो, दिग्दर्शन करतो, सिनेमा बनवतो, पेटी वाजवतो, कथाकथन करतो, टागोर बंगालीतून वाचता यावा म्हणून शांतीनिकेतन मध्ये जाऊन तळ ठोकतो ! केवळ अविश्वसनीय ! आयुष्याच्या अशा टप्प्यावर मला ही भूमिका मिळावी हे मी माझं भाग्य समजतो... त्यांना साकारताना मी स्वत: खूप धमाल केली आहे... मला आशा आहे प्रेक्षकांनाही आमचा सिनेमा आवडेल”.

टॅग्स :महेश मांजरेकर