Join us  

Best Of 2018 : या वर्षांत हे ठरले मराठीतील सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 1:16 PM

2018 हे वर्षं मराठी चित्रपटांसाठी खूपच चांगले होते. या वर्षांत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्यांनी जिंकले प्रेक्षकांचे मन...

ठळक मुद्देआणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात प्रेक्षकांना दिग्गज अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळाला. डॉ. काशिनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा सुबोध भावे अक्षरशः जगला आहे.

वेगळ्या आशयाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना 2018 मध्ये पाहायला मिळाले. या चित्रपटातील अभिनेत्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपला एक वेगळा ठसा उमटवला.

सुबोध भावे - आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात प्रेक्षकांना दिग्गज अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळाला. डॉ. काशिनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा सुबोध भावे अक्षरशः जगला आहे. त्याने प्रत्येक दृश्यात त्याच्या अभिनयाने एक जिवंतपणा आणला आहे. सुबोधने काशिनाथ यांच्या नाटकातील सगळ्याच भूमिका खूपच छानप्रकारे साकारल्या आहेत.

स्वप्निल जोशी - मुंबई पुणे मुंबई 3 मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटात स्वप्निल जोशी गौतम या भूमिकेत दिसला आहे. करियरमध्ये गुंतलेल्या गौतमला मूल म्हणजे एक जबाबदारी वाटत असते आणि त्यामुळे तो त्यासाठी तयार नसतो. पण आपल्या पत्नीने घेतलेल्या निर्णयामुळे तो देखील बाळासाठी तयार होतो. सुरुवातीला अल्लड असलेला आणि नंतर आपल्या जबाबदारीमुळे मॅच्युर्ड झालेला गौतम स्वप्निलने पडद्यावर खूप चांगल्याप्रकारे सादर केला आहे.

श्रीनिवास पोकळे - नाळ श्रीनिवास पोकळेने नाळ या चित्रपटात चैत्या ही भूमिका साकारली आहे. चैत्या हा आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे... एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तो आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या आयुष्यात रममाण असतो. पण त्याच्या आईवडिलांनी दत्तक घेतले असल्याचे त्याला अचानक कळते. यानंतर या मुलाच्या मनाची घालमेल कशी होते हे श्रीनिवासने त्याच्या अभिनयातून मांडले आहे.

चिन्मय मांडलेकर - फर्जंद फर्जंद या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने ही भमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहे. त्यांची देहबोली त्याने त्याच्या अभिनयातून खूपच चांगल्याप्रकारे सादर केली आहे. 

ओम भूतकर - मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न या चित्रपटातील राहुल प्रेक्षकांना चांगलाच भावला. शेतजमीन विकल्यानंतर राहुलच्या घरातल्यांना खूप चांगली रक्कम मिळते. पण ही रक्कम ते काहीच दिवसांत संपवून टाकतात आणि त्यानंतर त्याच्या वडिलांवर हमाली करण्याची वेळ येते. तो देखील वडिलांसोबत मार्केट यार्डमध्ये हमालाचे काम करत असतो. पण शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक त्याला सहन होत नाही आणि तो रागाच्या भरात एका व्यापाऱ्याचा खून करतो. एक सामान्य मुलगा ते एक अट्टल गुन्हेगार या दोन्ही भूमिकांना ओमने योग्य न्याय दिला आहे.

 

अशोक सराफ - मी शिवाजी पार्क बोलतोय मी शिवाजी पार्क या चित्रपटात अशोक सराफ यांनी दिगंबर सावंत या कॉन्स्टेबलची भूमिका साकारली आहे. आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगणारा, आपले दुःख कोणालाही न दाखवून देणारा दिगंबर त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे सादर केला आहे.

स्वानंद किरकिरे - चुंबक गतिमंद असलेल्या प्रसन्न ठोंबरे यांची व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरेने चुंबक या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते अंतिम दृश्यांपर्यंतच्या प्रत्येक दृश्यात स्वानंद भाव खावून जातात. प्रसन्नची निरागसता, एखादी गोष्ट पाहिजेच हा हट्टीपणा स्वानंदने खूपच छानप्रकारे मांडला आहे.

चित्तरंजन गिरी - लेथ जोशी लेथ जोशी या चित्रपटात चित्तरंजन गिरी यांनी लेथ जोशी ही भूमिका साकारली आहे. नोकरी गेल्यानंतर झालेली मनाची होत असलेली घालमेल चित्तरंजन गिरी यांनी देहबोलीतून उत्तमरित्या सादर केली आहे. आपल्या काळातच रमणारा, भूतकाळातील प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणारा लेथ जोशी चित्तरंजन गिरी यांनी खूप चांगल्याप्रकारे सादर केला आहे. 

के के मेनन - एक सांगायचंय....UNSAID HARMONY के के मेननने एक सांगायचंय या चित्रपटात कुमारवयात असलेल्या एका मुलाच्या बापाची भूमिका साकारली आहे. मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याची झालेली अवस्था, आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, त्याच्या करियरच्या पसंतीविषयी मुलाच्या मित्रांकडून कळल्यानंतर झालेली अवस्था के के मेननने त्याच्या अभिनयातून खूपच चांगल्या प्रकारे मांडली आहे. 

रितेश देशमुख - माऊली  रितेश देशमुखने माऊली या चित्रपटात माऊली नावाच्या दोन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या व्यक्तिरेखांचे स्वभाव हे अतिशय वेगळे असून या दोन्ही विरुद्ध टोकाच्या भूमिका त्याने खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.

 

टॅग्स :बेस्ट ऑफ 2018सुबोध भावे चिन्मय मांडलेकरस्वप्निल जोशी