Join us  

'फ्लिकर'च्या चित्रीकरणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 6:01 PM

निर्माते राज सरकार यांनी महेक फिल्म्सच्या बॅनरखाली 'फ्लिकर' या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे.

ठळक मुद्दे'फ्लिकर'च्या माध्यमातून राजवीर सरकारचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पणराजवीरसोबत झळकणार तन्वी किशोर

मराठीत नेहमीच वेगवेगळया विषयांवर आधारित सिनेमे बनत आहेत. विषय आणि आशयाची एकसंध मांडणी करून लिहिलेली पटकथा आणि त्याला दिलेली मनोरंजक मूल्यांची जोड या कारणांमुळे मराठी चित्रपट इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत उजवा ठरतो. याशिवाय अनोख्या शीर्षकांमुळेही मराठी चित्रपट वेगळे अस्तित्व जपण्यात यशस्वी होतो. असेच एक वेगळे शीर्षक असलेल्या 'फ्लिकर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.

निर्माते राज सरकार यांनी महेक फिल्म्सच्या बॅनरखाली 'फ्लिकर' या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. राज सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच, पण त्याला आणखी ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न फ्लिकरच्या निमित्ताने केला जात आहे. याबाबत बोलताना सरकार म्हणाले की,' हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारे कथानक, कर्णमधुर संगीत, सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवला जाणारा 'फ्लिकर' हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांनाही आपलासा वाटणारा ठरेल.''फ्लिकर'च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत राजवीर सरकार नवोदित अभिनेता पदार्पण करणार आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात दिसणार आहे. या दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल पाडावे करीत आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांनी प्रथमच एखाद्या मराठी सिनेमाला पूर्णपणे संगीत दिले आहे. याशिवाय 'कोलावरी डी...' फेम धनुषने या चित्रपटासाठी एक गाणेही गायले आहे.'फ्लिकर'मध्ये राजवीर सरकार, तन्वी किशोर, सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरूण कदम, गौरव घाटणेकर, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतिक्षा शिर्के या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच अमोल पाडावे यांनीच या सिनेमाची कथादेखील लिहिली आहे. पटकथा जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली असून संवाद समीर सामंत आणि मंदार चोळकर यांचे आहेत. कॅमेरामन उदयसिंग मोहिते या सिनेमाचे छायांकन करीत असून महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदिप काळे यांच्याकडे असून प्रशांत राणे या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :सय्याजी शिंदे