Join us

​भिकारी बनला करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 12:44 IST

स्वप्निल जोशीच्या भिकारी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आता ...

स्वप्निल जोशीच्या भिकारी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आता त्यानंतर प्रेक्षक देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने केवळ पहिल्या तीन दिवसात १ करोड ४८ लाखांची कमाई केली आहे. कोणत्याही मराठी चित्रपटाने केवळ पहिल्या तीन दिवसांत करोडोने कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटाचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्शने देखील ट्वीट केले आहे. भिकारी या चित्रपटाने शुक्रवारी ३१.५ लाख, शनिवारी ५३ लाख तर रविवारी ६४ लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमवले. या चित्रपटात प्रेक्षकांना आई-मुलाची कथा पाहायला मिळत आहे. भिकारी असे या चित्रपटाचे नाव असले तरी या चित्रपटाचे संपूर्ण नाव हे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत. आपल्या आईला गमवावे लागणार असे ज्यावेळी मुलाला वाटते, त्यावेळी आपल्या आईला वाचवायला मुलगा काय काय करतो हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. भिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले असून ते या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शनक्षेत्राकडे वळले आहेत. या चित्रपटात एक वेगळा स्वप्निल प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या चित्रपटात स्वप्निल कन्टेम्पररी, हिप हॉप यांसारखे डान्स प्रकार देखील करताना दिसला आहे. चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा स्वप्निल या चित्रपटाविषयी सांगतो, एक अभिनेता म्हणून प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या असतात. या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारायला मिळाली आहे आणि त्याचा मला खूप आनंद होत आहे.   Also Read : अभिनेता आणि माणूस म्हणून भिकारी या चित्रपटाने मला श्रीमंत केलेः स्वप्निल जोशी