Join us  

दिग्दर्शक आणि अभिनेत्याला चित्रपटगृहातच झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी मांडली त्यांची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 7:15 AM

अभिनेता-दिग्दर्शकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात आणि चित्रपटाबाबत झालेल्या गैरसमजाबाबत नुकतीच दिग्दर्शकाने आपली बाजू मांडली.

ठळक मुद्देदिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी चित्रपटाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.  

कोणत्याही दिग्दर्शकावर चित्रपटगृहात हल्ला व्हायची ही बहुधा पहिलीच वेळ. बायको देता का बायको या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकावर काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुरेश ठाणगे आणि दिग्दर्शक धनंजय यमपुरे बीड येथील आशा सिनेप्लेक्स थिएटरमध्ये प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. या घटनेनंतर आता दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘बायको देता का बायको’ या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात आणि चित्रपटाबाबत झालेल्या गैरसमजाबाबत खुलासा देण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी चित्रपटाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.  

प्रामाणिकपणे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहचावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटातून कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नसून सद्यस्थिती दाखवली आहे. आम्हाला झालेली मारहाण पूर्वग्रह मनात ठेवून झाली असल्याचे आम्हाला समजले. ज्यांच्यामुळे हा प्रकार आमच्यावर ओढवला त्या मुलांच्या पालकांनी आम्हाला तक्रार न करण्याची विनंती केली. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही हा चित्रपट केला त्याच मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली नाही, असं सांगत उगाच गैरसमज पसरवून चित्रपटाचे नुकसान न करता प्रत्येकाने हा चित्रपट आधी नक्की पाहावा असे आवाहन निर्माता-दिग्दर्शकांनी केले आहे. आम्हाला चित्रपटातून नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्यावे अशी विनंती दिग्दर्शक सुरेश ठाणगे आणि निर्माते धनाजी यमपुरे यांनी या पत्रकार परिषदेत केली.

‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं, सुंदर आणि सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघांत उठून दिसावी अशी इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या युवकांची कथा सांगणारा ‘बायको देता का बायको’ हा धमालपट असून तो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :मराठी