Join us  

जीवन गौरव पुरस्काराने सीमा देवा यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2017 5:28 AM

गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनं जिंकणारी रमेश देव आणि सीमा देव या जोडीने रसिकांचे आपल्या अभिनयाने मनोरंजन केले आहे.आजही ...

गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनं जिंकणारी रमेश देव आणि सीमा देव या जोडीने रसिकांचे आपल्या अभिनयाने मनोरंजन केले आहे.आजही या दोघांचा उत्साह थक्क करणारा असतो.'चुकभूल द्यावी घ्यावी' सिनेमातून हे दोघे एकत्र थिरकतानाही दिसले.आजही मिळालेल्या संधीतून रसिकांचे मनोंरजन कसे होईल याकडे या दोघांचा कटाक्ष असतो.‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘पाठलाग’, ‘वरदक्षिणा’, ‘सरस्वती चंद्र’, ‘आनंद’ अशा एक ना अनेक मराठी हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या सीमा देव यांना यावर्षीचा झी जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित रसिक प्रेक्षकही भारावून गेले होते.“आजवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कलाक्षेत्राची जेवढी सेवा करता येईल ती प्रामाणिकपणे केली. प्रेक्षकांनी वेळोवेळी त्यांच्या आवडीची पोचपावती दिली आणि आता हा पुरस्कार म्हणजे त्या सा-या मेहनतीचं गोड फळ आहे” असे सीमाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्याला आदर्शस्थानी असलेल्या सुलोचनादीदींच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं याहून मोठा सन्मान असूच शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी रंगमंचावर सीमाताईंचे दोन्ही सुपुत्र अजिंक्य व अभिनय देव तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं.एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा लवकरच रसिकांना छोट्या पडद्यावर पाहाता येणार आहे.