Join us  

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू'चा गौरव,सोहळ्यात पटकावले इतके पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 6:56 AM

प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार प्राप्त 'रेडू' चित्रपटाने राज्य पुरस्कारांमध्येही आपला डंका वाजवला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात ...

प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार प्राप्त 'रेडू' चित्रपटाने राज्य पुरस्कारांमध्येही आपला डंका वाजवला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण ७ सर्वोत्कृष्ट पूरस्कारांवर सागर छाया वंजारी दिग्दर्शित 'रेडू'ने आपले नाव कोरले आहे.नुकताच दिमाखात पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात 'रेडू' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा घोषित पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला.यासोबतच सागर छाया वंजारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी शशांक शेंडे यांना तर सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय नवगिरे, सर्वोत्कृष्ट संगीतसाठी विजय नारायण गवंडे आणि सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले यांना पुरस्कार मिळाला.लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असलेला हा 'रेडू' सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी - मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर केला गेला असून, या सिनेमाच्या माध्यमातून सामान्य माणसाचे भावविश्व या मांडण्यात आले आहे. प्रेक्षकांना मनोरंजांची मेजवानी देण्यास लवकरच येत असलेल्या या सिनेमाची दाखल यापूर्व अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये घेण्यात आली आहे. यापूर्वी प्रतिष्ठेच्या कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागातदेखील रेडूची निवड झाली होती. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट होता. तसेच  इफ्फीसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातदेखील 'रेडू'चा आवाज दणाणला होता. शिवाय दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये 'रेडू' सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मने गौरविण्यातदेखील आले होते. तसेच, केरळच्या चलत् चित्र अकादमीतर्फे दिग्दर्शक सागर छाया वंजारी यांना पदार्पणाच्या चित्रपटासाठी मानाच्या अरविंदन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.